देशात नव्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये, दहशतवादाच्या धोक्यात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:10 IST2025-10-22T11:10:31+5:302025-10-22T11:10:31+5:30
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती; अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेत संतुलन राखणे आवश्यक!

देशात नव्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये, दहशतवादाच्या धोक्यात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क,नवी दिल्ली : सीमेवर असलेल्या अस्थितरतेशी देश सध्या सामना करत आहे. दुसऱ्या बाजूस समाजामध्ये नव्या प्रकारच्या गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा, दहशतवादाचा धोका झपाट्याने वाढत आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले.
२१ ऑक्टोबर रोजी १९५९ मध्ये लडाखच्या ‘हॉट स्प्रिंग’ भागात चीनच्या सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या १० जवानांच्या स्मरणार्थ पोलीस स्मृतिदिन पाळण्यात येतो. त्यानिमित्त दिल्लीत राष्ट्रीय पोलिस स्मारकस्थळी मंगळवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले की, २०४७ पर्यंत विकसित भारत साकार होण्यासाठी देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षेतील संतुलन राखणे आवश्यक आहे. देशात पूर्वी जे भाग ‘रेड कॉरिडॉर’ म्हणून ओळखले जात होते, त्यांचे आता ‘ग्रोथ कॉरिडॉर’मध्ये रूपांतर होत आहे. नक्षलवादाविरोधात मिळवलेल्या मोठ्या यशाचे श्रेय पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांना आहे असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांना दुहेरी काम
राजनाथ म्हणाले की, लष्कर आणि पोलिस यांची कार्यपद्धती भिन्न असली तरी त्यांच्या कार्याचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे ते म्हणजे राष्ट्राचे संरक्षण. सीमेवरील अस्थिरतेसोबतच समाजामध्ये संघटित, अदृश्य आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. वैचारिक संघर्षाचे प्रसंगही वाढत आहेत. समाजात गोंधळ निर्माण करणे, देशातील स्थैर्याला धोका निर्माण करणे या हेतूने गुन्हे केले जात आहेत. त्यामुळे पोलिस दलाला गुन्हेगारी रोखणे आणि समाजातील विश्वासाचे वातावरण कायम राखणे ही कामे करावी लागत आहेत.
... म्हणूनच देश आणि देशवासीय सुरक्षित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, कर्तव्य बजावताना पोलिसांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची देशाने कायम स्मृती जपली आहे. पोलिसांची कर्तव्यनिष्ठा व त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे आपला देश, नागरिक सुरक्षित असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, गुन्हे तसेच अंतर्गत सुरक्षेसमोर उभी ठाकणारी संकटे रोखून पोलिसांनी मोठा इतिहास घडविला आहे. तसेच, २१ ऑक्टोबर रोजी असलेल्या आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिनानिमित्त शहा यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना आदरांजली अर्पण केली.