RBI आणतेय १०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार; अशी असतील खास वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 14:37 IST2021-05-29T14:35:56+5:302021-05-29T14:37:03+5:30
New 100 Rs. note: लवकरच तुमच्या खिशामध्ये १०० रुपयांची झगमगती नोट दिसण्याची शक्यता आहे.

RBI आणतेय १०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार; अशी असतील खास वैशिष्ट्ये
नवी दिल्ली - लवकरच तुमच्या खिशामध्ये १०० रुपयांची झगमगती नोट दिसण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ही नोट फाटू शकणार नाहीत. तसेच तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिल्यास ती पाण्यात भिजणारही नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १०० रुपयांच्या वॉर्निक लावलेल्या नोटा चलनात आणण्याची तयारी केली आहे. आरबीआय़ अशा एक अब्ज नोटा छापणार आहे.
नोटांना टिकाऊ आणि सुरक्षित बनवणे हा वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणण्यामागचा हेतू आहे. मात्र सध्यातरी केवळ प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जातील. हा प्रयोग यशस्वी ठरल्यावर हळूहळू वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणल्या जातील आणि जुन्या नोटा व्यवहारातून बाद केल्या जातील. रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.
सध्या चलनामध्ये जांभळ्या रंगाच्या १०० रुपयांच्या नोटा आहेत. आता आरबीआय़ वॉर्निश लावले्या १०० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. या नोटा सुद्धा जांभळ्या रंगाच्या असतील. या नोटांचं मुख्य वैशिष्ट्य असेल ते म्हणजे त्या कुठल्याही प्रकारे खराब होणार नाहीत. अनेकवेळा मोडून चुरगळल्यावरही या नोटा फाटणार किंवा कापणार नाहीत. तसेच वॉर्निश पेंट केलेला असल्याने त्या पाण्यात भिजणार नाहीत. सध्या चलनात असलेल्या नोटा या लवकर खराब होतात.
या नोटासुद्धा महात्मा गांधी सिरीजमधीलच असतील. त्यांची डिझाईन १०० रुपयांच्या नव्या नोटेप्रमाणेच असेल. वॉर्निश लावलेल्या नव्या नोटा सध्याच्या नोटांपेक्षा दुप्पट टिकाऊ असतील. १०० रुपयांच्या नोटेचा सरासरी कालावधी अडीच ते तीन वर्षांचा असतो. मात्र या नव्या नोटा सुमारे साडेसात वर्षे टिकतील.
केंद्र सरकारनेभारतीय रिझर्व्ह बँकेला १०० रुपयांच्या वॉर्निश लावलेल्या एक अब्ज नोटा छापण्यास मान्यता दिली आहे. गतवर्षी वित्तराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली होती.