नव्या खासदारांनी शरद पवार, देवेगौडा, खर्गेंकडून समर्पण शिकावं; PM मोदींकडून गौरव, रामदास आठवलेंचा खास उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:13 IST2026-03-18T13:10:24+5:302026-03-18T13:13:07+5:30
राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप दिला.

नव्या खासदारांनी शरद पवार, देवेगौडा, खर्गेंकडून समर्पण शिकावं; PM मोदींकडून गौरव, रामदास आठवलेंचा खास उल्लेख
नवी दिल्ली - संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतून ३७ खासदारांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांच्या योगदानाविषयी भाष्य करत अनेकांचे कौतुक केले. राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो, सभागृहात प्रत्येक खासदाराचे योगदान असते. बरेच खासदार पुन्हा सभागृहात परतणार आहेत. जे चाललेत आणि पुन्हा येणार नाहीत त्यांचीही वाट भविष्य पाहत आहे. तुमचा अनुभव, योगदान कायम राष्ट्रासाठी राहील असं मोदींनी निवृत्त होणाऱ्या खासदारांना म्हटलं.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या निरोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज या सभागृहातून जे सदस्य निरोप घेताहेत त्यातील काही जण पुन्हा परतणार आहेत. काही निरोप घेतल्यानंतर इथला अनुभव घेऊन सामाजिक जीवनात काही ना काही विशेष योगदान देत राहतील. सभागृहात अनेक विषयांवर चर्चा होते, प्रत्येकाचे त्यात महत्त्वपूर्ण योगदान असते. काही गोड तर काही कटू अनुभव आहेत. पण जेव्हा कधी संधी येते तेव्हा पक्षीय भावनेच्या पलीकडे जाऊन साहजिकच आपल्या सर्वांच्या मनात एक समान भावना निर्माण होते. आपले हे सहकारी आता काही दुसऱ्या विशेष कामासाठी पुढे जात आहेत असं त्यांनी सांगितले.
भविष्य आपली वाट पाहतोय...
जे जाताहेत आणि परतणार नाहीत त्यांना एकच सांगतो, राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो. भविष्य तुमची वाट पाहतोय. तुमचा अनुभव, तुमचे योगदान राष्ट्रासाठी कायम राहील. देवेगौडा, खर्गे आणि शरद पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांकडून समर्पण शिकण्यासारखे आहे. या नेत्यांचं अर्धे आयुष्य संसदीय कार्यप्रणालीत गेले आहे. जे सदस्य निवृत्त होताहेत त्यांना जुन्या आणि नवीन संसद भवनात बसण्याची संधी मिळाली. आपल्या कार्यकाळात नव्या संसदेचे बांधकाम आणि त्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या आयुष्यात ही नवीन आठवण कायम राहील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
रामदास आठवले यांचा खास उल्लेख
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात रामदास आठवले यांचा खास उल्लेख केला. कधी कधी सभागृहात हास्यविनोद, व्यंग करण्याची संधी मिळत राहते. आजकाल कदाचित ते हळूहळू कमी होत चाललं आहे. २४ तास माध्यमांचे आपल्यावर लक्ष असते, त्यामुळे अनेक जण सतर्क राहतात. परंतु आमचे रामदास आठवले सदाबहार आहेत. ते जात असले तरी त्यांची उणीव कधी भासणार नाही. ते व्यंगविनोद भरपूर देत राहतील याची खात्री आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
#WATCH दिल्ली | राज्यसभा में बोलते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "कभी-कभी हम सुनते थे कि सदन में ह्यूमर और सटायर के लिए बहुत मौके हैं। आजकल शायद यह धीरे-धीरे कम हो रहा है...लेकिन हमारे अठावले जी एवरग्रीन हैं। अठावले जी जा रहे हैं लेकिन यहां किसी को कोई कमी महसूस नहीं… pic.twitter.com/MOiNRtCdTb
— ANI_HindiNews (@AHindinews) March 18, 2026
महाराष्ट्रातून 'हे' खासदार निवृत्त
रामदास आठवले
शरद पवार
डॉ. भागवत कराड
फौजिया खान
प्रियंका चतुर्वैदी
धैर्यशील पाटील
रजनी पाटील