The new Congress president has limited rights? | नवीन काँग्रेस अध्यक्षाला असणार मर्यादीत अधिकार? 
नवीन काँग्रेस अध्यक्षाला असणार मर्यादीत अधिकार? 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. मात्र काँग्रेस कार्यकारणीने राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला तरी राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिले. त्यामुळे लोकसभा निकालापासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी काम करणारा सक्रीय नेता कोणीच राहिला नाही. अजूनपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवातदेखील झाली नाही. इतकचं नाही तर कर्नाटक, गोवा येथील अनेक काँग्रेस आमदारांनी राजीनामा देत सत्ताधारी पक्षात प्रवेश केले. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. 

काँग्रेस पक्षात इतक्या घडामोडी होत असताना काँग्रेस खरचं गांधी कुटुंबाच्या नियंत्रणातून मुक्त झाली आहे का? राहुल गांधी यांच्याऐवजी काँग्रेस अध्यक्षपद कोणाला दिलं जावं याबाबत पक्षात संभ्रम आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तीन महत्वाच्या घटनांमागे दडली आहेत. पहिली घटना अशी की, ज्या दिवशी राहुल गांधी यांनी राजीनामा परत घेणार नाही अशा आशयाचे चार पानी पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याच दिवशी राहुल यांच्या सहकाऱ्याने सांगितले की, राहुल यांच्यावर 20 पेक्षा अधिक मानहाणीचे खटले दाखल आहे त्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी मुंबईतील शिवडी कोर्टात आरएसएसने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी उपस्थित राहिले होते. 

दुसरी घटना अशी की, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पहिल्यांदा अधिकृतरित्या राजीनामा प्रस्ताव बैठकीत मांडला. मी एकट्याने लढलो असं वक्तव्य करुन पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली तसं इतरांना वाटलं नाही अशी नाराजी व्यक्त केली.  त्यानंतर तिसरी घटना 26 जून रोजी पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत राहुल गांधी यांनी मी पुन्हा दहापटीने कठोर मेहनत करणार असल्याचं सांगितले. त्यावेळी नवीन अध्यक्षपदासाठी शोधमोहीम सुरु होती. त्यामुळे या सगळ्या घटना लक्षात घेतल्या तर आगामी काळात काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा नवीन खांद्यावर दिली तरी लोकांमध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून राहुल गांधीच राहतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.  
 


Web Title: The new Congress president has limited rights?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.