नेवाशात नवीन ८१५ रोहित्रांना मंजुरी

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:09+5:302015-02-14T23:52:09+5:30

राम शिंदे : खामगावातील वीज उपकेंद्राचे उद्घाटन

New 815 Rohitas Approved in Nevash | नेवाशात नवीन ८१५ रोहित्रांना मंजुरी

नेवाशात नवीन ८१५ रोहित्रांना मंजुरी

म शिंदे : खामगावातील वीज उपकेंद्राचे उद्घाटन
नेवासा : तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी ८१५ नवीन रोहित्रांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह व पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी नेवासा तालुक्यातील खामगाव येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना दिली.
नेवासा तालुक्यातील वीज विकास कामांचा शुभारंभ तसेच तीर्थक्षेत्र विकासाची पाहणी करण्यासाठी ना. शिंदे शनिवारी (दि. १४) रोजी तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते. प्रारंभी त्यांनी श्रीक्षेत्र देवगडला भेट दिली. यावेळी महंत भास्करगिरी महाराज यांनी ना. शिंदे यांना देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन येथील विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली. येत्या काही काळात देवस्थानचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन दत्त जयंती उत्सव काळात वाहने पार्किंगची अडचण टाळण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील खामगाव येथील वीज उपकेंद्राचे उद्घाटन ना. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, जि.प.चे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, आ.बाळासाहेब मुरकुटे यावेळी उपस्थित होते.
यानंतर ना. शिंदे यांनी नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरास भेट दिली. यावेळी अपेक्षेप्रमाणे होणारा ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखडा पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा हा कार्यक्रम नियोजनाच्या अभावामुळे पूर्णपणे कोलमडला. काही मिनिटातच पालकमंत्र्यांनी हा कार्यक्रम आटोपता घेतला, याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तर तालुक्यातील जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शनिशिंगणापूर व त्रिवेणीश्वर येथे हजारोंच्या उपस्थितीत सुरू असलेल्या गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या रामकथा कार्यक्रमाला जाण्याचा नियोजित दौरा असताना देखील त्यांनी तालुक्यातील ज्वलंत प्रश्न असलेल्या बंधार्‍याच्या पाण्यासंदर्भात पुढील कालखंडात बंधारे करून दिले जातील, असे म्हणून पाण्याच्या ज्वलंत प्रश्नाला बगल दिल्याने जनतेसह शेतकर्‍यांचा यावेळी भ्रमनिरास झाला.

Web Title: New 815 Rohitas Approved in Nevash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.