पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:00 IST2025-09-18T09:59:22+5:302025-09-18T10:00:01+5:30
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील करेडा पोलीस स्टेशनच्या बागजाना गावात बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली.

पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील करेडा पोलीस स्टेशनच्या बागजाना गावात बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी बागजाना गावातील धरम तलावात जनावरांना पाण्यातून बाहेर काढत असताना १३ वर्षीय सुनील नाथ हा पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची चुलती लक्ष्मी देवी (वय, ४०) आणि तिचा १२ वर्षीय मुलगा प्रवीण नाथ यांनी तलावात उडी मारली. दुर्दैवाने, तिघेही खोल पाण्यात बुडाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मेंढपाळांनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली. मोठ्या संख्येने गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिघांनाही तलावातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने करेडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यांचा दावा आहे की, जखमींना रुग्णालयात आणले तेव्हा तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते आणि फोन केल्यानंतरही ते उशिरा पोहोचले. वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित लक्ष्मी देवीसह दोन चिमुकल्यांचा जीव वाचला असता, अशा शब्दांत गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.