नेपाळी साधूंना जागा मिळेना !

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:07+5:302015-08-02T22:55:07+5:30

Nepali sages get the space! | नेपाळी साधूंना जागा मिळेना !

नेपाळी साधूंना जागा मिळेना !

>वणवण सुरुच : भूकंपामुळे उशिराने कुंभस्थळी दाखल

नाशिक : नेपाळमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे कुंभमेळ्याला उशिराने दाखल झालेल्या नेपाळी साधूंच्या आखाड्यांना जागा मिळालेली नाही. कुंभमेळ्यासाठी नेपाळमधून एकूण तीनशे साधू येणार असून, त्यांना साधुग्राममध्ये जागा मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे.
भूकंपामुळे नेपाळमधील साधू-संत नाशिकला साधुग्राममध्ये जागा आरक्षित करण्यासाठी येऊ शकले नव्हते. त्यामुळे आता त्यांच्या जागेचा पेच निर्माण झाला आहे. नेपाळमधील मुक्तिधाम यात्री सेवा संस्थानाचे प्रबंधक माधवाचार्य रविवारी येथे दाखल झाले.
काठमांडूपासून अडीचशे किलोमीटरवरील मेगदी जिल्ह्यातील पोखरेबगर येथे त्यांचे सेवा संस्थान वसले आहे. त्यात आठ आश्रम आहेत. भारतातून नेपाळमध्ये देवदर्शनासाठी जाणार्‍या साधू-संतांच्या भोजन-निवासाची व्यवस्था तेथे केली जाते. मात्र भूकंपात सात आश्रम उद्ध्वस्त झाले आहेत. नव्याने बांधलेली एका आश्रमाची इमारतच उरली आहे. फलाहारी बाबा या आश्रमाचे प्रमुख आहेत. त्यांच्यासह नेपाळमधील सुमारे तीनशे साधू-महंत कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणार आहेत. त्यांच्या जागेची व्यवस्था कशी करावी, असा पेच आता माधवाचार्य यांच्यासमोर आहे. माधवाचार्य साधुग्राममध्ये भटकंती करत असताना, त्यांना मेळा अधिकार्‍यांना भेटण्याचा काहींनी सल्ला दिला. त्यांच्याकडून दिलासा मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
----------
भूकंपातून नेपाळ अजूनही सावरू शकलेला नाही. इमारतींचे ढिगारे तसेच आहेत. त्यातून सावरता-सावरता भारतात येण्यास उशीर झाला. गेल्या कुंभमेळ्यात पत्र दिल्यानंतर आमच्या दोनशे साधूंसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. यंदा ३०० साधू येणार असून प्रशासन सहकार्य करील, अशी अपेक्षा आहे.
- माधवाचार्य, नेपाळ
-----------------

Web Title: Nepali sages get the space!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.