घरे, सरकारी कार्यालये जळत होती..; बिहारच्या या गावाने अगदी जवळून पाहिला नेपाळ हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:43 IST2025-09-10T16:42:36+5:302025-09-10T16:43:01+5:30
Nepal Protest: नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

घरे, सरकारी कार्यालये जळत होती..; बिहारच्या या गावाने अगदी जवळून पाहिला नेपाळ हिंसाचार
Nepal Protest: भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये मागील तीन दिवसांपासून प्रचंड हिंसाचार सुरू आहे. सरकारविरोधातील रोषामुळे तरुणांनी संसद, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय आणि मंत्र्यांच्या घरासह अनेक ठिकाणी जाळपोळ केली. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारच्या अररिया जिल्हातदेखील पोलिस यंत्रणा सतर्क आहे.
बिहारमधील सात जिल्हे, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया आणि किशनगंज हे नेपाळच्या सीमेवर आहेत. या जिल्ह्यांमध्येही विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अररिया जिल्ह्यातील जोगबनी हे नेपाळला लागून असलेले सर्वात जवळचे गाव आहे. विशेष म्हणजे, या गावातील लोकांनी आपल्या डोळ्यांनी नेपाळमधील हिंसाचार पाहिला आहे. जोगबनीपासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या नेपाळमधील राणी भानसरजवळ निदर्शकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली.
जोगबनी येथील अजय प्रसाद सांगतात की, निदर्शकांनी रंगेली महानगरपालिकेसह अनेक सरकारी कार्यालयांना आग लावली. तसेच, अनेकांच्या घरांनाही पेटवले. विराटनगरमधील टॉवर चौकजवळ लोकांनी टायर पेटवून निदर्शने केली. अनेक दुचाकीही जाळण्यात आल्या. सीमेपलीकडे पेटलेल्या हिंसाचारानंतर, सीमावर्ती भागातील लोकांनी आपापली दुकाने आणि इतर व्यवसाय बंद केले.
सध्या प्रशासनाने जोगबनी सीमेपासून नेपाळकडे जाणारा रस्ता सील केला आहे. वाहनांच्या वाहतुकीवर पूर्ण बंदी घातली आहे. हिंसाचार पाहता, सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. किशनगंज जिल्ह्यातील अररिया येथे खुली सीमा असल्याने माइकिंग केले जात आहे. लोकांना नेपाळकडे न जाण्याचे आवाहन केले आहे. परिसरात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.