Prime Ministers Museum And Library Society: भारत सरकारने राजधानी दिल्लीतील तीन मूर्ती भवन संकुलात असलेल्या नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे (NMML) नाव बदलून 'पीएम म्युझियम अँड लायब्ररी' असे केले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसकडून सरकारवर जहरी टीका होत आहे. या टीकेला आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
तीन मूर्ती भवन हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान होते. सांस्कृतिक मंत्रालयाने शुक्रवारी (16 जून) सांगितले की, NMML च्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री आणि सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. राजनाथ सिंह होते.
मल्लुकार्जुन खर्गे काय म्हणाले?या निर्णयानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट केले की, “ज्यांना इतिहास नाही ते इतरांचा इतिहास पुसून टाकायला निघाले आहेत. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलून आधुनिक भारताचे शिल्पकार आणि लोकशाहीचे निर्भीड संरक्षक पंडित जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिमत्त्व कमी करता येणार नाही. यावरून भाजप-आरएसएसची मानसिकता आणि हुकूमशाही वृत्ती दिसून येते.''
जयराम रमेशांची टीकाकाँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "मोदी हे संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव आहे. 59 वर्षांहून अधिक काळ, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे जागतिक पुस्तके आणि नोंदींचा खजिना आहे. यापुढे याला पंतप्रधानांचे संग्रहालय आणि सोसायटी म्हटले जाईल. भारताच्या शिल्पकाराचे नाव आणि वारसा नष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी अजून काय करणार. आपल्या असुरक्षिततेच्या ओझ्याखाली दबलेला एक छोटा माणूस स्वयंघोषित विश्वगुरू म्हणून फिरत आहे,'' अशी टीका त्यांनी केली.
भाजपाध्यक्ष जेपी नड्डांचे प्रत्युत्तरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसच्या टीकेवर जोरदार प्रहार केला. नड्डा म्हणाले की, "एका घराण्यापलीकडे असेही नेते आहेत, ज्यांनी आपल्या देशाची सेवा केली आणि देश निर्माण केला. हे साधे सत्य स्वीकारण्यास असमर्थता असणे म्हणजे राजकीय अपचनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पंतप्रधानमंत्री संग्रहालय हा राजकारणाच्या पलीकडचा एक प्रयत्न आहे आणि तो साकारण्याची दृष्टी काँग्रेसकडे नाही.''
भाजप अध्यक्षांनी दुसर्या ट्विटमध्ये लिहिले की, "या मुद्द्यावर काँग्रेसचा दृष्टिकोन उपरोधिक आहे, कारण त्यांच्या पक्षाचे (काँग्रेस) एकमेव योगदान म्हणजे केवळ एका कुटुंबाचा वारसा टिकून राहावा यासाठी मागील सर्व पंतप्रधानांचा वारसा पुसून टाकणे. प्रत्येक पंतप्रधानांना पंतप्रधान संग्रहालयात सन्मान मिळाला आहे. पंडित नेहरूंशी संबंधित परिसर बदलण्यात आला नाही. उलट त्याची प्रतिष्ठा वाढवली आहे. ज्या पक्षाने भारतावर 50 वर्षांहून अधिक काळ राज्य केले, त्यांची अवस्था खरोखरच दुःखद आहे. यामुळेच लोक त्यांना नाकारत आहेत.''
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले ?संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संग्रहालय त्याच्या नवीन स्वरुपात पंडित नेहरूंपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे योगदान आणि त्यांच्यासमोरील विविध आव्हानांच्या वेळी त्यांनी दिलेले प्रतिसाद प्रतिबिंबित करते. सर्व माजी पंतप्रधानांचा आदर केला गेला आहे.