पाठ्यपुस्तकातून नेहरूंना वगळले
By Admin | Updated: May 9, 2016 03:14 IST2016-05-09T03:14:10+5:302016-05-09T03:14:10+5:30
भाजपाशासित राजस्थानमध्ये इयत्ता आठवीच्या नव्या पाठ्यपुस्तकामधून भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव वगळण्यात आले आहे.

पाठ्यपुस्तकातून नेहरूंना वगळले
जयपूर : भाजपाशासित राजस्थानमध्ये इयत्ता आठवीच्या नव्या पाठ्यपुस्तकामधून भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव वगळण्यात आले आहे. या आधीच्या पाठ्यपुस्तकात मात्र नेहरूंबाबत लिहिले होते. नेहरूंनी बॅरिस्टर बनल्यानंतर स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली आणि नंतर ते काँग्रेसचे अध्यक्षही बनले, तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, असे आधीच्या पुस्तकात म्हटले होते.
राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळ, अजमेरशी संबंधित इयत्ता आठवीच्या सामाजिक विज्ञानच्या सुधारित पुस्तकात नेहरूंबाबत कोणताही उल्लेख नाही. हे पुस्तक अद्याप बाजारात उपलब्ध झालेले नाही, पण हे पुस्तक राजस्थान पाठ्यपुस्तक मंडळाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे.
या संशोधित पुस्तकात स्वातंत्र्य संग्राम सेनानी हेमू कलानी यांचे नाव जोडण्यात आले आहे. त्यासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी अन्य नावांचा मात्र उल्लेख आहे, परंतु पं. नेहरूंचे नाव अथवा स्वातंत्र्य लढ्याबाबतच्या धड्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांमध्ये त्यांचा नामोल्लेख नाही.