हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:42 IST2025-07-29T13:41:45+5:302025-07-29T13:42:40+5:30
रुग्णावर उपचार करण्याऐवजी टेबलवर पाय ठेवून डॉक्टर गाढ झोपेलेले पाहायला मिळत आहेत.

फोटो - आजतक
मेरठच्या एलएलआरएम मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रुग्णावर उपचार करण्याऐवजी टेबलवर पाय ठेवून डॉक्टर गाढ झोपेलेले पाहायला मिळत आहेत. तसेच रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती समोर स्ट्रेचरवर पडलेला आहे. डॉक्टर झोपून राहिले त्यामुळे जखमी व्यक्तीवर उपचार झाले नाहीत आणि तडफडून त्याचा मृत्यू झाला.
मेरठमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या एलएलआरएम मेडिकल कॉलेजमध्ये ही भयंकर घटना आहे, जिथे गंभीर रुग्णांना २४ तास उपचार मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु या प्रकरणाने वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन सेवांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर लोकांचा रोष उफाळून आला आहे आणि अनेक युजर्सनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.सी. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेला एक रुग्ण रात्री आला आणि मदत मागत होता. परंतु घटनास्थळी उपस्थित असलेले ज्युनियर डॉक्टर झोपले होते. याची दखल घेत, त्यावेळी ड्युटीवर असलेल्या दोन ज्युनियर डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
व्हायरल व्हिडिओमध्ये ऑर्थोपेडिक्स विभागाचे डॉ. भूपेश कुमार राय हे घटनेच्या वेळी झोपलेले दिसले. जखमी आणि त्यांचे कुटुंबीय उपचारांसाठी याचना करत होते. व्हिडिओची तात्काळ दखल घेत डॉ. भूपेश कुमार राय आणि ज्युनियर डॉक्टर अनिकेत यांना निलंबित करण्यात आले आहे आणि तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
उपचारांअभावी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचं नाव सुनील असं आहे. तो हसनपूर गावचा रहिवासी होता. रस्ता ओलांडताना सुनीलला मागून एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. कुटुंबाने डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे आणि म्हटलं आहे की सुनीलला वेळेवर दाखल करण्यात आलं होतं परंतु डॉक्टर झोपले होते आणि त्यांनी त्याच्यावर उपचार केले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.