संगम पुलाजवळ घर खचले
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:11+5:302015-08-28T23:37:11+5:30

संगम पुलाजवळ घर खचले
>नागपूर : धंतोलीच्या संगम पूल परिसरात शुक्रवारी रात्री अचानक एक घर खचल्याने खळबळ उडाली. हे घर विष्णू शंकर डोंगरे नामक अंध व्यक्तीचे आहे. घटनेच्या वेळी डोंगरे व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. लोकांनी वेळीच त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.विष्णू डोंगरे यांचे घर नागनदी शेजारी असलेल्या परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ९ वाजताच्या सुमारास भूकंप झाल्यासारखे डोंगरे यांचे घर अचानक जमिनीत घुसले. त्यावेळी डोंगरे व त्यांची पत्नी व दोन मुले घरीच होते. अचानक झालेल्या प्रकारामुळे मुले व पत्नी बाहेर पडले, मात्र विष्णू डोंगरे अंध असल्याने त्यांना समजले नाही व ते तेथेच फसले. आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक धावून आले व त्यांना बाहेर काढण्यात आले. दोनतीन दिवसापूर्वीच या भागात जमिनीला भेगा पडल्याचे लोकांनी सांगितले. प्राणहानी झाली नाही, मात्र डोंगरे यांच्या घरातील सर्व सामान व कपडेलत्ते नाल्यात वाहून गेले. याबाबत अग्निशमन विभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे विष्णू डोंगरे यांनी सांगितले. विष्णू अंध असूनही लुडो, चेस, सापशिडी यांसारख्या खेळाचे साहित्य तयार करण्याचे काम करतात. सिव्हील लाईन भागात रस्ता रुंदीकरणात निवारा गेल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्तांनी संगम पुलाजवळ राहण्यासाठी जागा दिल्याचे डोंगरे यांनी सांगितले. मात्र शुक्रवारच्या घटनेमुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे.