पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि १७ उपमुख्यमंत्री उपस्थित होते. २०२४ मध्ये एनडीए-३ ची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी बैठक आहे.
या बैठकीत ऑपरेशन सिंदूरची चर्चा, जातीय जनगणनेच्या समर्थनासाठी प्रस्ताव आणि विकासाला प्राधान्य देण्यावर चर्चा झाली. अशोका हॉटेलमध्ये ही बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
ऑपरेशन सिंदूरने सामान्य भारतीयांमध्ये आत्मविश्वास आणि अभिमानाची एक नवीन भावना निर्माण केल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मोदींच्या ऑपरेशन सिंदूर आणि जातीय जनगणनेच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते. जो कोणी आमच्याशी संघर्ष करेल तो धुळीला मिळेल. केंद्र सरकारच्या धोरणाला, लष्कराच्या शौर्याला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धाडसाला आम्ही सलाम करतो, असे शिंदे म्हणाले. सुरक्षित, समृद्ध आणि अखंड भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहण्याचा एनडीएचा निर्धार आहे. एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो, असे शिंदे म्हणाले.
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल भारतीय सशस्त्र दलांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी पहिला ठराव मंजूर करण्यात आला. दुसऱ्या ठरावात जनगणनेदरम्यान जातीचा डेटा गोळा करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे कौतुक करण्यात आले. या बैठकीत एनडीएची सत्ता असलेल्या राज्यात त्या त्या सरकारनी काय केले याचीही चर्चा केली जाणार आहे.