NDA उद्या लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार; 26 जून रोजी निवडणूक होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 20:06 IST2024-06-24T20:05:10+5:302024-06-24T20:06:11+5:30
सध्या भाजप खासदार भर्त्रहरी मेहताब 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष आहेत.

NDA उद्या लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार; 26 जून रोजी निवडणूक होणार
Lok Sabha : लोकसभा निवडणुकीनंतर आता आजपासून(दि.24) संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या नियुक्तीवरुन बराच राजकीय गोंधळ पाहायला मिळतोय. दरम्यान, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार असून, उद्या, म्हणजेच 25 जून रोजी NDA आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करेल. मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच NDA चा उमेदवार जाहीर होईल.
सध्या भाजपचे खासदार भर्त्रहरी मेहताब 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक येथील भाजप सदस्य भर्त्रहरी मेहताब यांची घटनेच्या कलम 95(1) नुसार हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीपर्यंत ते लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याची कर्तव्ये पार पाडतील आणि नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड करतील.
लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार
अध्यक्षांच्या पॅनेलनंतर प्रो टेम स्पीकर मंत्रिपरिषदेला लोकसभा सदस्य म्हणून शपथ देतील. येत्या दोन दिवसांत सर्व सदस्य वर्णक्रमानुसार शपथ घेतील. लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून त्यानंतर लगेचच पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळाचा परिचय करुन देतील. 27 जून रोजी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेला 28 जूनपासून सुरुवात होणार आहे. 2 किंवा 3 जुलै रोजी पंतप्रधान चर्चेला उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.