नवी दिल्ली - लोकसभेमध्ये साडेतीनशेहून अधिक खासदारांचे भक्कम पाठबळ मिळवल्यानंतर आता राज्यसभेमध्येही एनडीए बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तेलगू देसमच्या चार आणि आयएनएलडीच्या एका खासदाराने भाजपात प्रवेश केल्याने भाजपा आणि एनडीएचे संख्याबळ वाढले आहेत. आता 5 जुलै रोजी अजून चार खासदार एनडीएमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे, असे झाल्यास राज्यसभेमध्ये एनडीए बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचेल. राज्यसभेतील संख्याबळ वाढल्याने अनेक महत्त्वाकांक्षी विधेयके पारित करून घेणे सत्ताधारी भाजपाला शक्य होणार आहे. रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत 235 सदस्य असलेल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एनडीएचे 111 सदस्य आहेत. सध्या राज्यसभेच्या 10 जागा असून, त्यापैकी एनडीएचे चार खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीएच्या सदस्यांचा आकडा 115 पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे 241 सदस्यांच्या राज्यसभेत एनडीएचे 115 सदस्य असतील, अशा परिस्थितीत एनडीए बहुमतापासून केवळ 6 जागांनी मागे राहील. तर राज्यसभेत संपूर्ण 245 सदस्यांची नियुक्ती झाल्यास एनडीएला बहुमतासाठी 123 सदस्यांची गजर पडेल.
राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 09:57 IST