भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशिदीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:26 IST2025-12-08T18:25:17+5:302025-12-08T18:26:00+5:30
JDU Leader News: भाजपाच्या मित्रपक्षातील एका खासदाराने पश्चिम बंगालमधील बाबरी मशीद बांधकामाला समर्थन दिले आहे.

भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशिदीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
JDU Leader News: तृणमूल कांग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर हे बंगालमध्ये बाबरी मशिदीची उभारणी करण्याची घोषणा करून सध्या चर्चेत आले आहेत. हुमायूं कबीर यांच्या समर्थकांनी विटा घेऊन आगेकूच सुरू केल्याचे फोटोही समोर आले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यातच एनडीएतील भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्यांनी बाबरी मशिदीला समर्थन दिले असून, मुस्लीम समाजाला अधिकार असल्याचे म्हटले आहे.
हुमायूं यांनी त्यांच्यासोबत असंख्य मुस्लीम असल्याचा दावा केला. मशिदीच्या निर्मितीसाठी सर्व मुसलमान पुढे येत असल्याचे सांगत त्यांनी लोकांना देणगी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. हुमायूं कबीर यांनी फेसबुक अकाऊंटवर मुर्शिदाबादमधील बाबरी मशीद उभारणीसाठी लोकांकडून मिळालेल्या देणगीची रक्कम मोजत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही लोक पैसे मोजताना दिसतात. आतापर्यंत एकूण ११ बॉक्स देणगीचे प्राप्त झालेत. त्यातील रक्कम मोजली जात आहे. ही देणगी मोजण्यासाठी ३० जण काम करत आहेत. त्याशिवाय बँक अकाऊंटच्या माध्यमातून आतापर्यंत ९३ लाख जमा झाल्याची माहिती देण्यात आली.
आम्ही संविधानाचे पालन करत आहोत
जेडीयूचे खासदार कौशलेंद्र कुमार यांनी हुमायूं कबीर यांना पाठिंबा दिला आहे. संविधान सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार देते. मशीद बांधायला हवी, अशी मुस्लीम समाजाची भावना असेल तर कोणालाही त्यात अडचण नसावी. मुस्लिमांना बाबरी मशीद बांधण्याचा अधिकार आहे, असे कौशलेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद बांधणे म्हणजे आक्रमणकर्त्याचा सन्मान आहे, या भाजपच्या भूमिकेपासून कौशलेंद्र कुमार यांनी वेगळे मत मांडले आहे. मी बाबरला पाहिलेले नाही. मला त्याच्याबद्दल फारसे माहिती नाही. परंतु स्वातंत्र्यापासून, आम्ही धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या संविधानाचे पालन करत आहोत, असेही कुमार म्हणाले.
दरम्यान, पश्चिम बंगाल येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा राज्यात मशिदीच्या प्रस्तावित बांधकामाला भाजपा का विरोध करत आहे, असे विचारले असता कौशलेंद्र कुमार यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले. तुम्ही जसे चित्रित करत आहात तशी परिस्थिती नाही. खरे तर, ममता बॅनर्जी यांनी स्वतः एका मुस्लिम नेत्यावर धार्मिक भावना व्यक्त केल्याबद्दल कारवाई केली आहे.