“राज ठाकरेंनीही EVMवर शंका उपस्थित केली”; सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी-राऊतांसमोर दिला डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:32 IST2025-02-07T15:32:08+5:302025-02-07T15:32:32+5:30

NCP SP Group MP Supriya Sule News: ईव्हीएम मशीन आणि मतदारांच्या संख्येवरून राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन टीका केली.

ncp sp group mp supriya sule said in front of rahul gandhi and sanjay raut that raj thackeray also raised doubts on evm machine | “राज ठाकरेंनीही EVMवर शंका उपस्थित केली”; सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी-राऊतांसमोर दिला डेटा

“राज ठाकरेंनीही EVMवर शंका उपस्थित केली”; सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी-राऊतांसमोर दिला डेटा

NCP SP Group MP Supriya Sule News: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निकालांनी अनेकांना धक्के बसले. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळालेली महाविकास आघाडी भुईसपाट झाली, तर लोकसभेला निराशाजनक कामगिरी झालेल्या महायुतीने विधानसभेत जोरदार कमबॅक करत ऐतिहासिक विजय मिळवला. या गोष्टीला आता काही महिने उलटून गेले असले तरी विरोधक मात्र ईव्हीएम मशीनचा मुद्दा घेऊन टीका करताना पाहायला मिळत आहे. ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत विरोधकांनी ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच दिल्लीत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत काही आकडेवारीच मांडली आणि अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील डेटा मीडियासमोर सादर केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांचे नाव घेतले आणि त्यांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्याचे सांगितले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तम जानकर आमदार म्हणून निवडून आले. उत्तम जानकर यांचे असे म्हणणे आहे की, मी निवडून आलो आहे, परंतु मतदान जे व्हायला हवे होते, तसे झाले नाही. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात, अशी मागणी करत आहेत. महाराष्ट्रत असे अनेक विधानसभा मतदारसंघात घडले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, मनसेचा एक उमेदवार आहे, त्याला स्वत:चे मत मिळालेले नाही. याबाबतचा सर्व डेटा तुमच्यासमोर आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक आयोग सरकारची गुलामी करते आहे. आम्ही वारंवार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमचे डोके फोडले. ३९ लाख मतदार कुठून आले आणि कुठे जाणार, आता हे ३९ लाख मतदार बिहारला जाणार. नावे तीच राहणार, आधार कार्ड तीच राहणार, फक्त ते मतदार फिरत राहणार. काही दिल्लीत आले, काही बिहारला जातील. महाराष्ट्र पॅटर्न दिल्ली, बिहार मग उत्तर प्रदेशातही राबवणार, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
 

Web Title: ncp sp group mp supriya sule said in front of rahul gandhi and sanjay raut that raj thackeray also raised doubts on evm machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.