Rafale Deal Controversy: शरद पवारांच्या 'खास' माणसाचा राष्ट्रवादीला रामराम; त्या विधानाने नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 12:45 IST2018-09-28T11:25:11+5:302018-09-28T12:45:04+5:30
Rafale Deal Controversy: राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारीक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, लोकसभेतल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे.

Rafale Deal Controversy: शरद पवारांच्या 'खास' माणसाचा राष्ट्रवादीला रामराम; त्या विधानाने नाराज
नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, लोकसभेतल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. शरद पवारांनीराफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली होती. तसेच मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं ते म्हणाले होते. पवारांच्या या विधानावर नाराज होत तारिक अन्वर यांनी राजीनामा दिल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तारिक अन्वर हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते.
NCP national general secretary Tariq Anwar quits the party, also resigns from the post of Lok Sabha MP. (File pic) pic.twitter.com/vX4ablr9fL
— ANI (@ANI) September 28, 2018
बिहारमधल्या कटिहारमधून राष्ट्रवादीतर्फे तारिक अन्वर हे लोकसभेत खासदार आहेत. पवारांच्या भूमिकेवर ते काहीसे नाराज होते. गेल्या काही दिवसांपूर्वी तारिक अन्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल करारावरून टीका केली होती. राफेल करारातील घोटाळ्यात सहभाग असल्याच्या आरोपांवर मोदींनी अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. त्यात पवारांनी मोदींना दिलेल्या क्लीन चिटवर मी असहमत आहे. मी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे. शरद पवार यांचा व्यक्तिगतरीत्या मी सन्मान करतो. परंतु त्यांचं हे विधान दुर्दैवी आहे. या विधानानं मला अतीव दुःख झाल्यानं मी हे पाऊल उचललं आहे, असं तारिक अन्वर यांनी सांगितलं आहे.