नक्षलवाद्यांची उडविली दाणादाण
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:19+5:302015-02-16T23:55:19+5:30
मृत्यूच्या गुहेत शिरकाव

नक्षलवाद्यांची उडविली दाणादाण
म त्यूच्या गुहेत शिरकाव नरेश डोंगरे नागपूर : एका वर्षात तीन घातपात घडवून नक्षल्यांनी ५३ पोलिसांचे बळी घेतल्यामुळे गडचिरोलीतील पोलीस दल थरारले होते. या काळात आर.आर. पाटील पालकमंत्र्याच्या रूपाने ढाण्या वाघासारखे नक्षल्याच्या गुहेत शिरले आणि पुढे त्यांनी नक्षलवाद्यांची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. आबांच्या निधनाने कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्यांनाही आठवणींचा गहिवर दाटून आला आहे. धाडसी आबांच्या आठवणींचे काही किस्से संबंधित अधिकाऱ्यांनी आज उघड केले.२००९-१० मध्ये नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात चुहामाकड, हत्तीटोला आणि मरकेगाव परिसरात मोठे घातपात घडवून ५३ पोलिसांचे बळी घेतले. नक्षल्यांच्या क्रौर्यामुळे पोलीस दल अक्षरश: शहारले होते. अशात आबांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. धानोरा तालुक्यात पीएससीजवळ घातपाताची घटना घडली. त्यावेळी पावसामुळे तेथे मोठे वाहन जायला मार्ग नव्हता. नक्षलवादी घात लावून बसले असू शकतात, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगूनही आबांनी चक्क मोटरसायकलवरच घटनास्थळ गाठले. परत येईपर्यंत सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकले होते. सिरोंचा, एटापल्ली, कोरची, चामोर्शी, मुलचेरा भागात हत्या, अपहरण, जाळपोळ करून नक्षल्यांनी नागरिक (अन् पोलिसांनाही) धडकी भरवली होती. कुणी तिकडे फिरकण्याची तसदी घेत नव्हते. आबांनी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभूंना सोबत घेत चक्क मृत्यूच्या गुहेत शिरकाव केला. दोन दिवस सारखे फिरत त्यांनी नागरिक आणि पोलिसांना आश्वस्त केले. नदीला प्रचंड पूर असताना डोंग्यातून दुर्गम भागात जाणाऱ्या आबांचे धाडस अधिकाऱ्यांसोबतच भाबड्या आदिवासींनाही स्तंभित करणारे होते. संवेदनशील आबागडचिरोली-गोंदियात निमलष्करी दलासह पोलिसांची दुप्पट फोर्स, अत्याधुनिक हत्यारं, हेलिकॉप्टरसोबत पोलिसांचे वाढलेले मनोबल ही आबांचीच देण आहे. प्लाटून कमांडरला पकडल्याबद्दल गोंदियाचे एसपी दिलीप झळकेंना पहाटेच दिलेली शाबासकी, डॉ. आरती सिंह यांच्या कामगिरीसाठी पदकाची शिफारस अन् भल्या पहाटे अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमित सैनी यांच्या पत्नीला फोन करून हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याची दिलेरी केवळ आबासारखेच नेते दाखवू शकतात. थरारक किस्से सांगताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कंठ दाटून येतो, त्यातूनच आबांच्या धाडसी, दिलेर अन् संवेदनशीलवृत्तीचा प्रत्यय यावा. ---