नक्षलींचा 'डोंगर' सुरक्षा दलांच्या ताब्यात; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:39 IST2025-05-02T08:38:30+5:302025-05-02T08:39:10+5:30

देशातील सर्वात मोठी मोहीम ठरली यशस्वी

Naxalite mountain taken over by security forces Action taken on Chhattisgarh-Telangana border | नक्षलींचा 'डोंगर' सुरक्षा दलांच्या ताब्यात; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाई

नक्षलींचा 'डोंगर' सुरक्षा दलांच्या ताब्यात; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाई

नवी दिल्ली : छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील सुमारे ५,००० फूट उंच असलेल्या आणि नक्षलवाद्यांचा मुख्य तळ मानल्या गेलेल्या कर्रेपट्टा डोंगरावर अखेर सुरक्षादलांनी पुन्हा ताबा मिळवला आहे. नऊ दिवस चाललेल्या कठोर लढ्यानंतर, सुरक्षादलांनी हा प्रदेश पुन्हा ताब्यात घेत तिरंगा फडकवला.

हा भाग नक्षल नेता हिडमा, देवा, दामोदर, आझाद आणि सुजाता यांचा गड मानला जात असे. परंतु आता या भागावर पूर्णपणे सुरक्षादलांचे नियंत्रण आहे. हे अभियान छत्तीसगडमधील बस्तर परिसरात आजवरचे सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान मानले जात आहे.

'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन

या मोहिमेत जिल्हा राखीव दल, बस्तर फायटर्स, विशेष कार्यदल, राज्य पोलीस दलाच्या सर्व युनिट्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्यांचे विशेष कमांडो ‘कोब्रा’ यांनी सहभाग घेतला होता. सुमारे २४,००० सुरक्षा कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते.

कर्रेपट्टा आणि दुर्गमगट्टा या डोंगरांच्या घनदाट जंगलात ८०० चौरस किलोमीटरच्या परिसरात २१ एप्रिलपासून हे अभियान सुरू झाले. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने, सुरक्षादलांनी उंचसखल भागात प्रवेश करत नक्षलवाद्यांना हुसकावून लावले.

केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक जी.पी. सिंग यांनीही बुधवारी मोहिमेच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला.

हा डोंगर पूर्वी माओवादी ‘जनमुक्ती गुरिल्ला लष्कर’ (पीएलजीए) च्या बटालियन क्रमांक १ चा मुख्य तळ होता. हे नक्षलवादी या भागातील आदिवासींवर दबाव टाकून सुरक्षित आसरा घेत असत. आता मात्र सुरक्षादलांनी तो संपूर्ण भाग नक्षलांपासून मुक्त केला आहे.

 पीएलजए, तेलंगणा राज्य समिती, दंडकारण्य विशेष झोनल समिती आणि मध्यवर्ती प्रादेशिक समिती या नक्षली संघटनांच्या यांच्या हालचाली पूर्णपणे बंद पाडणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या ठिकाणी जवळपास ५०० नक्षलवादी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधी ठोस कार्ययोजना आखली आहे.

छत्तीसगड सरकारने स्पष्ट केले आहे की, हिंसक मार्ग स्वीकारणाऱ्यांशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. आत्मसमर्पण करणाऱ्यांना शासनाच्या धोरणानुसार मदत आणि पुनर्वसन दिले जाईल, परंतु हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

२०२४ मध्ये आतापर्यंत १४४ नक्षलवादी चकमकीत ठार मारण्यात आले असून त्यातील १२८ हे बस्तर विभागातील आहेत. मार्च २९ रोजी झालेल्या दोन मोठ्या चकमकांमध्ये १८ नक्षलवादी ठार झाले होते, ज्यात ११ महिला होत्या.

याच कालावधीत सुमारे

३०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांना प्रत्येकी ५०,०००

रुपये आर्थिक मदत आणि पुनर्वसन सुविधा दिल्या गेल्या आहेत. २०२४

मध्ये एकूण ७९२ नक्षलवाद्यांनी

केवळ बस्तर भागात आत्मसमर्पण केले आहे.

Web Title: Naxalite mountain taken over by security forces Action taken on Chhattisgarh-Telangana border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.