"तुम्ही शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या, अन्यथा..."; अमित शाहांचं नक्षलवाद्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:01 IST2025-04-05T17:00:33+5:302025-04-05T17:01:25+5:30
बस्तरचा विकास तेव्हाच होईल जेव्हा इथं शांतता येईल. मुले शाळेत जातील. गावागावात आरोग्य सुविधा उभ्या राहतील. प्रत्येकाकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, आरोग्य कार्ड असेल असं शाह यांनी म्हटलं.

"तुम्ही शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या, अन्यथा..."; अमित शाहांचं नक्षलवाद्यांना आवाहन
बस्तर - जे नक्षलवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावं. जे नाही करणार त्यांना सुरक्षा दलाशी सामना करावा लागेल. शस्त्राच्या बळावर आदिवासींचा विकास रोखू शकत नाही. तुम्ही शस्त्रे टाका आणि मुख्य प्रवाहात या असं आवाहन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढच्या चैत्र नवरात्रीपर्यंत बस्तरमधील लाल दहशत संपवून टाकू असा इशारा दिला आहे. दंतेवाडा येथील बस्तर पंडुम महोत्सवाच्या समारोपात ते बोलत होते.
यावेळी अमित शाह म्हणाले की, तो काळ गेला जेव्हा बस्तरमध्ये गोळ्या चालत होत्या. बॉम्बस्फोट व्हायचे. मी पुन्हा आवाहन करतोय, ज्यांच्या हातात शस्त्रे आहेत आणि ज्यांच्या हाती शस्त्रे नाहीत त्यांनाही..तुम्ही शस्त्रे टाका आणि मुख्य प्रवाहात या. तुम्ही आमचेच आहात. जेव्हा कधी नक्षली मारले जातात तेव्हा कुणाला आनंद होत नाही. परंतु परिसराचा विकास करायचा आहे जो मागील ५० वर्षात झाला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ वर्षात बस्तरला सर्व काही देतील असं त्यांनी सांगितले.
तसेच बस्तरचा विकास तेव्हाच होईल जेव्हा इथं शांतता येईल. मुले शाळेत जातील. गावागावात आरोग्य सुविधा उभ्या राहतील. प्रत्येकाकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, आरोग्य कार्ड असेल. जेव्हा बस्तरचे लोक स्वत: आपलं घर, गाव नक्षलमु्क्त करतील तेव्हाच हे शक्य आहे. कुणी कुणाला मारू इच्छित नाही. फक्त शस्त्रे सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात या. भारत सरकार आणि छत्तीसगड सरकार मिळून तुम्हाला सुरक्षा देईल. तुम्ही आदिवासी बांधवांचा विकास रोखू शकत नाही. विकासाच्या प्रक्रियेचा तुम्ही भाग व्हा असं अमित शाह यांनी म्हटलं.
मोदी सरकार में बस्तर नक्सलमुक्त हो रहा है और विकास का स्वर्णिम कालखंड देख रहा है। दंतेवाड़ा (छत्तीसगढ़) में आयोजित ‘बस्तर पंडुम’ में जनजातीय बहनों-भाइयों से संवाद कर रहा हूँ... https://t.co/Mr7fKDh2p5
— Amit Shah (@AmitShah) April 5, 2025
दरम्यान, आज आम्ही नक्षलवादाविरोधात दोन्ही बाजूने पुढे जात आहोत. विकासासाठी हातात बंदुकीची आवश्यकता नाही. कॅम्प्युटरची गरज आहे. ज्यांना समजलं, विकासासाठी आईईडी, विस्फोटक नव्हे तर कलम हवी त्यांनी सरेंडर केले आहे. २०२५ च्या चौथ्या महिन्यापर्यंत ५२१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जे नक्षल चळवळ सोडणार नाहीत त्यांच्याविरोधात सुरक्षा दल कठोर कारवाई करेल. जे काही असेल पण पुढील वर्षी मार्चपर्यंत संपूर्ण देश लाल दहशतीपासून मुक्त करण्याचं काम भाजपा सरकार करेल असा निर्वाणीचा इशाराही अमित शाह यांनी दिला आहे.