छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 20:08 IST2025-11-11T20:07:10+5:302025-11-11T20:08:26+5:30
Naxalite Encounter : या वर्षी आतापर्यंत 259 नक्षलवादी ठार झाले आहेत.

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
Naxalite Encounter : छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी चकमकीत 6 नक्षलवाद्यांना ठार केले. तसेच, त्यांच्याकडून इन्सास रायफल, स्टेनगन, 303 रायफल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बीजापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितले की, राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात माओवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर, डीआरजी बीजापूर, डीआरजी दंतेवाडा आणि एसटीएफ या संयुक्त पथकाला नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते. सकाळी सुमारे 10 वाजल्यापासून अधूनमधून गोळीबार सुरू झाला.
चकमकीत निर्णायक यश
बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, ही कारवाई सुरक्षा दलांसाठी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक विजय आहे. सध्या माओवादी संघटना नेतृत्वविहीन आणि दिशाहीन अवस्थेत असून, काही उरलेल्या तळांपुरतीच मर्यादित आहे. या मोहिमेत सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाचे अतिरिक्त जवान परिसरात तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेता येईल. सुरक्षा कारणास्तव सध्या चकमकीचे ठिकाण आणि सहभागी जवानांची संख्या उघड केली जाणार नाही.
या वर्षी 259 नक्षलवादी ठार
या ताज्या कारवाईनंतर 2025 मध्ये आतापर्यंत 259 नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत. त्यापैकी 230 जण बस्तर विभागात (ज्यात बीजापूरसह सात जिल्हे आहेत) ठार झाले आहेत, तर 27 गरियाबंद जिल्ह्यात आणि 2 दुर्ग विभागातील मोहला-मानपूर-अंबागढ चौकी जिल्ह्यात ठार झाले आहेत. यामध्ये 22 सप्टेंबर रोजी नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत सीपीआय (माओवादी) संघटनेचे दोन वरिष्ठ नेते राजू दादा उर्फ कट्टा रामचंद्र रेड्डी (63) आणि कोसा दादा उर्फ कडारी सत्यनारायण रेड्डी (67) यांचाही समावेश आहे.