नौदलाचे प्रात्याक्षिक सुरू असताना एक थरारक प्रसंग घडला. हवेत प्रात्याक्षिक करत असतानाच दोन जवानांचे पॅराशूट एकमेकांमध्ये गुंतले. पॅराशूट एकमेकांत गुंतत गेल्याने दोन्ही अधिकारी नंतर समुद्रात पडले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. नौदलाच्या बोट समुद्रात असल्याने त्यांना सुखरुप किनाऱ्यावर आणण्यात आले.
विशाखापट्टनम येथे नौदलाच्या ईस्टर्न कमांडच्या वतीने प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. हवेत आणि पाण्यात चित्तथरारक बघायला मिळत आहे. प्रात्याक्षिके सुरू असताना हेलिकॉप्टरमधून दोन पॅराशूटसह दोन जवानांनी उड्या मारल्या.
प्रात्याक्षिक करून दाखवत असतानाच त्यांचे पॅराशूट एकमेकांमध्ये गुंतले. पॅराशूट गुंतल्याने जवानांचे संतुलन बिघडले आणि ते भिंगरी सारखे फिरत खाली आले आणि समुद्रात कोसळले.
या सगळा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी समुद्रात नौदलाच्या बोटी होत्या. त्यांनी तातडीने जवान पडलेल्या ठिकाणी धाव घेतली. दोन्ही जवानांना पाण्यातून बाहेर काढून किनाऱ्यापर्यंत आणण्यात आले. सुदैवाने यात दोन्ही जवानांना कोणतीही दुखापत झाली नाही.