National Film Award Video : 'लता करे' राष्ट्रीय पुरस्कारासाठी पुढे येताच टाळ्यांचा कडकडाट, स्टँडिंग ओव्हेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 19:28 IST2021-10-25T19:14:12+5:302021-10-25T19:28:07+5:30
स्वत:च्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनयाबद्दल लता करे यांनाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आज त्यांनी दिल्ली दरबारी हा पुरस्कार स्विकारला.

National Film Award Video : 'लता करे' राष्ट्रीय पुरस्कारासाठी पुढे येताच टाळ्यांचा कडकडाट, स्टँडिंग ओव्हेशन
मुंबई - ‘‘मी काल ही संघर्ष केला, आजही माझा संघर्ष सुरु आहे आणि पुढे ही माझ्या जीवनात संघर्ष सुरु राहणार आहे. प्रयत्नांना वयाचे कोणतेही बंधन नसते यामुळे जिंकणे चिरतरुण आहे.’’ असे सांगणाऱ्या ‘लता भगवान करे - एक संघर्ष गाथा’ मराठी चित्रपटातून समाजासमोर आली. विशेष म्हणजे या चित्रटातीली लता करेंच्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कारही जाहीर झाला होता. त्यानंतर, आज स्वत: लता करे यांनी राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्याहस्ते हा पुरस्कार स्विकारला.
स्वत:च्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनयाबद्दल लता करे यांनाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आज त्यांनी दिल्ली दरबारी हा पुरस्कार स्विकारला. त्यावेळी, मोठ्या टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत आणि कौतुक करण्यात आलं. मराठमोळी आजीच्या धाडसाला आणि जिद्दीला या टाळ्यांमधून राजदरबारात मानवंदनाच देण्यात आली.
Who would have thought that someday a person like Lata Kare ji, from such humble background, would get #NationalFilmAwards2019?
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 25, 2021
The entire house rose up and gave standing ovation. Overwhelming. pic.twitter.com/L5xqv6xvT1
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते विवेक रंजन अग्निहोत्री यांनीही ट्विट करुन लता करेंचं अभिनंदन केलं आहे. तसेच, लता करेंना संपूर्ण सभागृहाने स्टँडींग ओव्हेशन देऊन त्यांच्या यशाचं कौतुक केल्याचंही अग्निहोत्री यांनी सांगितलं.
सत्य घटनेवर आधारीत चित्रपट
वयाच्या ६५ व्या वर्षी नऊवारी साडीमध्ये धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या लता करे यांच्या आयुष्यातील सत्य घटनेवर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नवीन देशबोईना यांनी केले आहे. सामान्य महिलेची ही असामान्य गोष्ट सांगणारा टीजर अंगावर रोमांच उभे करतो. वास्तव घटनेवर आधारित या चित्रपटात लता करे यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात त्यांचे पती भगवान करे, मुलगा सुनील करे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असून या दोन्ही व्यक्तिरेखा या दोघांनीच साकारल्या आहेत. तसेच चित्रपटात रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत.
संघर्षाची प्रेरणादायीक कथा
या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांचे संगीत असून पार्श्वसंगीत कन्नू समीर यांनी दिले आहे. ‘एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे. फक्त स्वःतला ओळखण्याचा अवकाश आहे’’ असे लता करे सांगतात. वयाच्या मर्यादा ओलांडत नियतीवर मात केलेल्या सामान्य महिलेच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा या चित्रपटातून समाजासमोर आली आहे.