२००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान, म्हणाले, तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 22:57 IST2025-03-16T22:56:55+5:302025-03-16T22:57:45+5:30
Narendra Modi News: २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे.

२००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान, म्हणाले, तेव्हा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन यांना दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे. तसेच गोध्रा येथे घडलेली घटना भयंकर होती. तिथे लोकांना जिवंत जाळलं गेलं. त्यानंतर गुजरातमध्ये दंगे भडकले, असं विधान केलं.
२००२ साली गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठी दंगल भडकली होती. तसेच या दंगलीत हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. गोध्रा हत्याकांड आणि गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या कटू आठवणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही गुजरात दंगलींसारख्या ज्या मागच्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्याआधीच्या १२ ते १५ महिन्यांच्या कालावधीत काय काय घडलं याचं चित्र मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. त्यामधून त्यावेळच्या परिस्थितीचा तुम्हाला अंदाज येईल. उदाहरण घ्यायचं झाल्यास २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडू येथून दिल्लीला येणाऱ्या भारतीय विमानाचं अपहरण झालं होतं. तसेच अपहरणकर्ते या विमानाला अफगाणिस्तानमधील कंधार येथे घेऊन गेले होते. शकडो भारतीय ओलीस धरले गेले होते. त्यावरून संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण होतं. प्रवाशांच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता.
त्यानंतर २००० साली दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त करून हजारो लोकांचा बळी घेतला होता. ऑक्टोबर २००१ मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर तर १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता. या हल्ल्यांमागे असलेल्या लोकांची मानसिकता एकसारखी होती. ८ ते १० महिन्यांच्या अंतराने ह्या घटना घडल्या होत्या. अशा परिस्थितीत ७ ऑक्टोबर २००१ रोजी मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं, असंही मोदींनी सांगितलं.
गोध्रा हत्याकांडा आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, २४ फेब्रुवारी २००२ रोजी मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो. जनतेचा प्रतिनिधी बनून मला तीन दिवस झाले होते. २७ फेब्रुवारी २००२ रोजी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गुजरातच्या विधानसभेत बसलो होतो. त्याचवेळी अचानक गोध्रा येथे झालेल्या हत्याकांडाची माहिती समोर आली. ही एक भयंकर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. कंधार अपहरण, संसदेवर हल्ला, एवढंच नाही तर ९/११ चा हल्ला या घटनांनंतर एवढ्या लोकांना मारणं आणि जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. त्यावेळी परिस्थिती किती तणावपूर्ण असेल, याची तुम्ही कल्पनाच करू शकता. ही बाब खरोखरच दु:खद होती. प्रत्येकजण शांतता पसंत करतो.