पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेलं 'ऑपरेशन सिंदूर', त्यानंतर पाकिस्तानने केलेली आगळीक, त्यांना भारतीय लष्कराने दिलेला दणका आणि अखेर दोघांनी सहमतीने घेतलेला युद्धविरामाचा निर्णय या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं आहे. "गेल्या काही दिवसांत आपण सर्वांनी देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिलं आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने शक्तिशाली भारतीय सैन्य, आपल्या गुप्तचर संस्था आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आपल्या शूर सैनिकांच्या अफाट शौर्याला मी सलाम करतो" असं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि सांगितलं की, "जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. भारताची दहशतवादाविरुद्धची मोहीम फक्त स्थगित करण्यात आली आहे. भविष्यात कठोर निर्णय घेतले जातील आणि त्याला प्रत्युत्तरही दिलं जाईल. न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच असेल."
"आम्ही भारतीय सशस्त्र दलांना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण अधिकार दिले आहेत. ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही. हे राष्ट्राच्या सामूहिक भावनेचं एक शक्तिशाली प्रतिक आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी एकत्र उभा राहिला."
"सैन्याने प्रचंड शौर्य दाखवलं. आम्ही लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर मारण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले केले. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल, याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं होतं, म्हणून भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलं. भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या कृतीने पाकिस्तान हादरला आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.