Narendra Modi : "दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव, लूट करणं हाच उद्देश"; नरेंद्र मोदींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 16:24 IST2023-11-14T16:13:05+5:302023-11-14T16:24:31+5:30
Narendra Modi : राहुल गांधींना टोला लगावत मोदी म्हणाले की, "काँग्रेसचे एक महाज्ञानी आजकाल मध्य प्रदेशात फिरत आहेत. महाज्ञानीसारख्यांच्या विचारसरणीने देश उद्ध्वस्त केला आहे."

Narendra Modi : "दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव, लूट करणं हाच उद्देश"; नरेंद्र मोदींचा घणाघात
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये राहुल गांधींना टोला लगावत मोदी म्हणाले की, "काँग्रेसचे एक महाज्ञानी आजकाल मध्य प्रदेशात फिरत आहेत. महाज्ञानीसारख्यांच्या विचारसरणीने देश उद्ध्वस्त केला आहे."
"जिथे जिथे काँग्रेस आली, तिथे विनाश झाला. काँग्रेस शेतकरी, तरुण आणि महिलांची शत्रू आहे. ती जे काही करते, ते एका कुटुंबाच्या नावावर करते. काँग्रेसला तुमच्या कुटुंबाची पर्वा नाही. आज संपूर्ण मध्य प्रदेश म्हणत आहेत की, पुन्हा एकदा भाजपाचे सरकार."
"काँग्रेसकडे तुम्हाला देण्यासाठी फक्त निराशा, विरोध आणि नकारात्मकता आहे. काँग्रेस स्वभावानेच दंगल आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देते. देशातील कोणतीही व्यक्ती काँग्रेसचे कारनामे विसरू शकत नाही. भाजपाने मध्य प्रदेशला अतिशय खोल विहिरीतून बाहेर काढलं आहे."
"3 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील तेव्हा देश दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करेल. मध्य प्रदेशात भाजपाचा झंझावात लोकांच्या प्रचंड पाठिंब्याने काँग्रेसला उखडून टाकेल" असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
"जिथे काँग्रेस सत्तेवर आहे, तिथं फक्त लूट, लूट आणि फक्त लूट हाच त्यांचा उद्देश आहे. मोदींना लॉकर्स कसे माहीत आहेत याची त्यांना चिंता आहे. लॉकर्स उघडले जात आहेत आणि पैशांचे ढीग बाहेर पडत आहेत आणि हे खरं सोनं आहे."
"भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि काँग्रेस कोणत्याही राज्याला उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशला खूप सावध राहावं लागेल. जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, इतिहास माहीत असणं महत्त्वाचं आहे. फक्त तुमच्या पालकांना विचारा की ते कोणत्या प्रकारचं जीवन जगत होते" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.