निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानाच्या ताकदीचा वापर, नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 06:43 IST2025-01-20T06:43:32+5:302025-01-20T06:43:52+5:30
Narendra Modi News: निवडणूक आयोगाने जनशक्तीला अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग केला आहे आणि निष्पक्ष मतदान प्रक्रियेसाठी वचनबद्धतादेखील दर्शविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानाच्या ताकदीचा वापर, नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने जनशक्तीला अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग केला आहे आणि निष्पक्ष मतदान प्रक्रियेसाठी वचनबद्धतादेखील दर्शविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. २५ जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनापूर्वी आणि भाजपच्या बाजूने कथित पक्षपातीपणाबद्दल विरोधकांकडून सतत टीका होत असताना त्यांनी आयोगाचे कौतुक केले.
निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारीला झाली होती. हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान म्हणाले की, मी आयोगाचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी वेळोवेळी आमची मतदान प्रक्रिया आधुनिक आणि मजबूत केली आहे. विरोधी पक्ष निवडणूक प्रक्रियेतील काही पैलू आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ही टिप्पणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी संविधान सभेतील चर्चेदरम्यानची ऑडिओ क्लिपही ऐकविली.
लोकशाही बळकट आणि समृद्ध झाली
लोकशाही प्रक्रियेचा एक भाग बनून मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा १९५१-५२ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा काही लोकांना अशी शंका व्यक्त केली होती की, देशाची लोकशाही टिकेल की नाही.
मात्र, आपल्या लोकशाहीने सर्व शंका खोट्या ठरविल्या. भारत ही लोकशाहीची जननी आहे. गेल्या काही दशकांत देशाची लोकशाही बळकट आणि समृद्ध झाली आहे.