Indian Air Strike on Pakistan: भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. लष्कराने मिसाईल अटॅक करून दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं. या यामध्ये जैश आणि हिजबुल सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय आणि लपण्याची ठिकाणे देखील समाविष्ट आहेत. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, काल रात्री हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत अनेक बैठका घेतल्या होत्या. यातील गुप्त बैठीतमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट संदेश दिला होता की, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी आपल्या अनेक महिलांना विधवा केलं आणि पुरुषांना मारून त्यांचं कुंकू पुसलं. याच कारणामुळे पंतप्रधानांनी या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव दिलं.
दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हटलं की, "मी याबद्दल आभारी आहे कारण पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दाखवून दिलं आहे की आपण शांत बसणारे नाही." तसेच कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनी देखील केलेली कारवाई पूर्णपणे योग्य आहे आणि ऑपरेशन सिंदूर असं नाव देऊन त्यांनी महिलांना आदर दिल्याचं म्हटलं आहे.
पहलगाम हल्ल्यात कानपूर येथील ३१ वर्षीय व्यापारी शुभम द्विवेदी यालाही आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पत्नी ऐशान्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. "माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. ही माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. माझे पती जिथे कुठेही असतील तिथे आज ते शांततेत असतील" असं ऐशान्याने म्हटलं आहे.