पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर जाऊन जवानांशी संवाद साधला. त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मोदींच्या या भेटीत या एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ आणि भारताचे सुरक्षा कवच ठरलेली रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० देखील जगाला दिसली. पाकिस्तानी लढाऊ दलाचे विमान JF-17 ने आदमपूर एअरबेससह तिथे तैनात असलेली एस ४०० देखील नष्ट केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने यासाठी हायपरसोनिक मिसाईलचा वापर केला होता असा दावा करण्यात आला होता. तो दावा आज भारताने खोडून काढला आहे.
भारताने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली ताकद दाखवून दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या हवाई योद्ध्यांना मोदींनी संबोधित केलं. "ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हे देखील दाखवून दिलं की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी आरामात श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
"आपल्या ड्रोन, क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानची उडवली झोप"
भारताच्या आधुनिक लष्करी क्षमतेचं कौतुक करून मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. "आपले ड्रोन, आपली क्षेपणास्त्र ... त्यांच्याबद्दल फक्त विचार केल्याने पाकिस्तानची अनेक दिवसांची झोप उडून जाईल. भारत ही बुद्धांची भूमी आहे आणि गुरु गोविंद सिंहजी यांचीही भूमी आहे. गुरु गोविंद सिंहजी यांनी म्हटलं होतं की, 'सवा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं' वाईटाचा नाश करण्यासाठी आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे. म्हणूनच जेव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचं सिंदूर हिसकावून घेतलं गेलं, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना चोख उत्तर दिलं."
"१०० हून अधिक दहशतवादी मारले गेले"
"ते भित्र्यासारखे लपून आले, पण ते विसरले की, त्यांनी ज्याला आव्हान दिलं होतं ते भारतीय सैन्य होतं. समोरून हल्ला करून तुम्ही त्यांना मारलं आहे. दहशतवादाचे सर्व प्रमुख अड्डे उद्ध्वस्त केले. ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले, १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवादाच्या सूत्रधारांना आता हे समजलं आहे की भारताकडे नजर वर करून पाहिल्यास एकच परिणाम होईल तो म्हणजे विनाश" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.