Narendra Modi 24 Years in Governance: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सत्तेत येऊन २४ वर्षे पूर्ण केली आहेत. ७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांनी पहिल्यांदा गुजरातच्यामुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. १३ वर्षे गुजरातचे नेतृत्व केल्यानंतर २०१४ मध्ये पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री झाले. तेव्हापासून त्यांनी सलग तीनवेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला आहे. या प्रसंगी त्यांनी देशवासीयांचे आभार मानत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
२५व्या वर्षात पदार्पण...
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या X (पूर्वी ट्विटर) पोस्टमध्ये लिहिले, “आजच्याच दिवशी २००१ मध्ये मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. देशवासियांच्या आशीर्वादाने आज मी शासनप्रमुख म्हणून सेवेसच्या २५व्या वर्षात प्रवेश करत आहे. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. देशातील लोकांचे जीवनमान उंचावणे आणि भारताच्या प्रगतीत आपले योगदान देणे, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे.”
भूकंप, दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात नेतृत्वाची जबाबदारी
नरेंद्र मोदींनी नमूद केले की, “२००१ मध्ये पक्षाने माझ्यावर गुजरातची जबाबदारी सोपवली, तेव्हा गुजरात अत्यंत कठीण परिस्थितीत होता. त्याच वर्षी प्रचंड भूकंप झाला होता, त्याआधी चक्रीवादळ, सततचा दुष्काळ आणि राजकीय अस्थिरता अनुभवली होती. या सर्व संकटांनी मला अधिक दृढ बनवले. जनतेच्या सेवेसाठी आणि गुजरातच्या पुनर्निर्माणासाठी मी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार केला.”
गरीबांसाठी काम कर आणि कधीही लाच घेऊ नको...
मोदींनी आपल्या आईने दिलेल्या दोन शिकवणींची आठवण करुन दिली. “जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा माझ्या आईने सांगितले ‘मला तुझ्या कामाचे फार ज्ञान नाही, पण दोन गोष्टी लक्षात ठेव: एक, नेहमी गरीबांसाठी काम कर आणि दोन, कधीही लाच घेऊ नको.’ मी लोकांनाही सांगितले की, माझा प्रत्येक निर्णय प्रामाणिक हेतूने आणि शेवटच्या माणसाच्या सेवेसाठी प्रेरित असेल.”
गुजरातचा संपूर्ण कायापालट
मोदी पुढे म्हणाले, "जेव्हा मी मुख्यमंत्रीपद स्वीकारले, तेव्हा सर्वत्र निराशा होती. लोकांना वीज, पाणी, रोजगारचा अभाव होता, कृषी आणि उद्योग क्षेत्र अस्थिर झाले होते. त्या स्थितीतून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गुजरातला ‘गुड गव्हर्नन्स’चे पॉवरहाऊस बनवले. गुजरात, जो पूर्वी दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जात होता, तो कृषी उत्पादनात देशातील अग्रगण्य राज्य ठरला. व्यापार संस्कृतीचे रूपांतर मजबूत औद्योगिक आणि उत्पादन क्षमतेत झाले. वारंवार लागणारे कर्फ्यू संपले आणि सामाजिक तसेच भौतिक पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली."
गुजरातहून दिल्लीपर्यंतचा प्रवास
"२०१३ मध्ये मला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्या काळात देशात शासनावरचा विश्वास कमी झाला होता आणि यूपीए सरकारवर भ्रष्टाचार, कुटुंबवाद आणि धोरणात्मक अपयशाचे आरोप होते. त्या काळी भारताला जागतिक पातळीवर कमजोर दुवा मानले जात होते. परंतु भारताच्या जनतेने आमच्या आघाडीला प्रचंड बहुमत दिले. ३० वर्षांनंतर प्रथमच एका पक्षाला केंद्रात पूर्ण बहुमत मिळाले."
आत्मनिर्भर भारत; जनतेच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम
“गेल्या ११ वर्षांत आपण सर्व भारतीयांनी मिळून अनेक परिवर्तन घडवले. आपल्या नारीशक्ती, युवाशक्ती आणि मेहनती अन्नदात्यांनी देशाला बळ दिले आहे. २५ कोटींहून अधिक लोक गरीबीच्या चक्रातून बाहेर आले आहेत. आज भारताला जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये एक ‘ब्राइट स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. भारताकडे आता जगातील सर्वात मोठ्या आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा योजना आहेत. शेतकरी नवकल्पनांद्वारे देशाला आत्मनिर्भर बनवत आहेत. ‘गर्व से कहो, ये स्वदेशी है’ ही भावना आज प्रत्येक क्षेत्रात दिसते आहे. भारताच्या जनतेचा विश्वास आणि स्नेह हे माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. संविधानाच्या मूल्यांना मार्गदर्शक मानून मी विकसित भारताच्या स्वप्नासाठी अधिक जोमाने काम करत राहीन,” अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी व्यक्त केली.
Web Summary : PM Modi marks 24 years in power, recalling his journey from Gujarat CM in 2001 to Prime Minister. He emphasizes his focus on serving the poor, fighting corruption, and transforming Gujarat. Modi credits India's progress to collective efforts towards self-reliance.
Web Summary : पीएम मोदी ने सत्ता में 24 साल पूरे किए, 2001 में गुजरात के मुख्यमंत्री से प्रधानमंत्री बनने तक की अपनी यात्रा को याद किया। उन्होंने गरीबों की सेवा, भ्रष्टाचार से लड़ने और गुजरात को बदलने पर जोर दिया। मोदी ने आत्मनिर्भरता की दिशा में सामूहिक प्रयासों को भारत की प्रगति का श्रेय दिया।