गुजरातच्या वोटर लिस्टमध्ये १७ लाख 'मृत' मतदारांची नावं! SIRने केले मोठे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:25 IST2025-12-05T11:23:12+5:302025-12-05T11:25:07+5:30
देशातील अनेक राज्यांप्रमाणेच गुजरातमध्येही मतदार यादीतील त्रुटी किती गंभीर आहेत, याचा एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

गुजरातच्या वोटर लिस्टमध्ये १७ लाख 'मृत' मतदारांची नावं! SIRने केले मोठे खुलासे
निवडणुका म्हटलं की, मतदार यादी हा कळीचा मुद्दा असतो. मात्र, देशातील अनेक राज्यांप्रमाणेच गुजरातमध्येही मतदार यादीतील त्रुटी किती गंभीर आहेत, याचा एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण प्रक्रियेत हे उघड झाले आहे की, गुजरातच्या सध्याच्या मतदार यादीत तब्बल १७ लाखांहून अधिक मृत व्यक्तींची नावे अजूनही समाविष्ट आहेत. एवढेच नव्हे, तर डबल व्होटर्स आणि पत्त्यावर न आढळणाऱ्या मतदारांची संख्याही लाखोंच्या घरात आहे.
बिहारच्या पावलावर पाऊल...
बिहारमध्ये झालेल्या एसआयआर प्रक्रियेनंतर आता अनेक राज्यांमध्ये या विशेष गहन पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. गुजरातमध्येही ही मोहीम ४ नोव्हेंबर रोजी बूथ लेव्हल ऑफिसर्सनी त्यांच्या भागांमध्ये 'एन्यूमरेशन फॉर्म' वाटून सुरू केली. ही प्रक्रिया ११ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
१७ लाखांहून अधिक मृत मतदारांचे आकडे!
राज्याच्या निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या महत्त्वपूर्ण मोहिमेदरम्यान मतदार यादीतील अनेक त्रुटी समोर येत आहेत. या तपासणीत हा धक्कादायक आकडा उघड झाला आहे की, संपूर्ण राज्यातील मतदार यादीत जवळपास १७ लाख मरण पावलेल्या मतदारांची नावे अद्यापही नोंदणीकृत आहेत.
लाखोंच्या घरात स्थलांतरित आणि बेपत्ता
मृत मतदारांसोबतच, ६.१४ लाखांहून अधिक मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळले नाहीत. याचाच अर्थ, हे मतदार एकतर कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत किंवा त्यांचा पत्ता बदलला आहे. आयोगाच्या आकडेवारीनुसार, कायमस्वरूपी स्थलांतर केलेल्या मतदारांची संख्या ३० लाखांहून अधिक आहे, ज्यांची नावे यादीतून वगळणे आवश्यक आहे.
३.२५ लाख मतदार 'रिपीटेड'
मतदार यादी शुद्धीकरणाच्या या कामात आणखी एक मोठी त्रुटी समोर आली आहे ती म्हणजे 'डबल व्होटर्स'. एसआयआर प्रक्रियेदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर्सला ३.२५ लाखांहून अधिक मतदार 'रिपीटेड' श्रेणीत आढळले. याचा अर्थ एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी किंवा एकापेक्षा जास्त वेळा मतदार यादीत समाविष्ट आहे. ही बाब निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यंत धोकादायक मानली जाते.
११ डिसेंबरपर्यंत काम सुरू
सीईओंच्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात २०२५च्या मतदार यादीत नोंदणीकृत ५ कोटींहून अधिक मतदारांना 'एन्यूमरेशन फॉर्म' वाटण्यात आले आहेत. राज्यातील ३३ पैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये १००% फॉर्म वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.
डिजिटायझेशनचा वेग
मतदारांनी भरून परत केलेले फॉर्म आता डिजिटाइज करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १८२ विधानसभा जागांपैकी १२ जागांवर डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. यामध्ये बनासकांठा, दाहोद, अरावली, राजकोट, आनंद, जुनागढ, नवसारी आणि खेड़ा जिल्ह्यांतील काही मतदारसंघांचा समावेश आहे. या प्रक्रियेत डांग जिल्हा सर्वात पुढे असून, तेथे परत आलेल्या फॉर्मपैकी ९४.३५% डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, गुजरातची मतदार यादी अधिक शुद्ध आणि अचूक होईल, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे.