विशेष लेख: ‘काळ्यां’च्या मानगुटीवरल्या ‘गोऱ्या’ भूतांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 08:04 IST2025-01-30T08:04:11+5:302025-01-30T08:04:50+5:30
विकसनशील देश ‘ब्लॅक स्कीन, व्हाइट मास्क’ दुभंगाचे बळी ठरत आहेत. भारत त्या मार्गाने जाऊ नये अशी माझी मनापासून अपेक्षा आहे.

विशेष लेख: ‘काळ्यां’च्या मानगुटीवरल्या ‘गोऱ्या’ भूतांचा गोंधळ
एन. आर. नारायण मूर्ती, संस्थापक, इन्फोसिस |
भारतातलं वातावरण सध्या चांगलंच उत्साहाचं आहे, हे तर खरंच! मी राहतो त्या बंगळुरू शहरातल्या मध्यमवर्गीय भागातही मला एक चैतन्य जाणवतं. नवनवीन दुकानं, हॉटेल्स, रुग्णालयं, सलून्स, वाहनांच्या शोरुम्स आणि अशा असंख्य आधुनिक सोयीसुविधा! नवनवे स्टार्टअप्स येतात. आपले शास्त्रज्ञ संशोधनात आघाडीवर आहेत. डी. गुकेशसारखा भारतीय मुलगा जगातला सर्वात लहान बुद्धिबळ विजेता झालाय. आपला ‘जीडीपी’ही आज जगातील सर्वात चांगल्या जीडीपीमध्ये मोडतो. आपली परकीय चलनाची गंगाजळी समाधानकारक परिस्थितीत आहे. थोडक्यात सगळं चांगल्या दिशेनेच चाललं आहे. पण हे सगळं काही मूठभर भारतीयांच्याच वाट्याला येतं आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. भारताच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करणारे नेते, क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यापासून आपण अजूनही बरेच लांब आहोत हे वास्तव आहे.
आजही ३०० दशलक्ष भारतीय शिक्षणापासून वंचित आहेत. १७० दशलक्ष भारतीयांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. आपली २१० दशलक्ष एवढी लोकसंख्या उघड्यावर शौचाला जाते. केंद्र आणि देशातली राज्य सरकारं कितीही चांगलं काम करत असली तरी ५० दशलक्ष लोकांना प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत आणि १५ टक्के मुलं कुपोषित आहेत हे आपलं दुर्दैवी वास्तव!
भारतातली गरिबी हा माझ्या दृष्टीने नेहमीच चिंतेचा विषय आहे. उद्योजकतेची कास धरून ही गरिबी कमी करण्याचा प्रयत्न मी ‘इन्फोसिस’च्या निमित्ताने करून पाहिला, तो काही प्रमाणात यशस्वीही झाला. पण भारतासारख्या प्रचंड मोठ्या कॅनव्हासवरच्या गरिबीचा विचार करतो तेव्हा मला अस्वस्थ, असह्य आणि हतबल वाटलं नाही असा एक दिवसही जात नाही. यासंदर्भात माझ्या विचारांवर मोठा प्रभाव टाकणारी तीन लेखक आहेत: मॅक्स वेबर, महात्मा गांधी आणि फ्रँट्झ फॅनन. वेगवान आर्थिक परिवर्तनाचा मार्ग चोखाळण्यापूर्वी आपण सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनावर लक्ष केंद्रित करायला हवं हे याच तिघांनी मला पटवलं.
‘भरपूर कष्ट, शिस्त, चांगली मूल्य आणि थोड्या स्मार्टनेसच्या जीवावर महत्त्वाकांक्षी लोक कुठल्याही अडचणींवर मात करत यशस्वी राष्ट्राची निर्मिती करू शकतात’ या माझ्या विचाराचा पाया मॅक्स वेबरने घातला. विकास नावाच्या ‘जिग्सॉ पझल’मधला मला सापडलेला हा पहिला तुकडा! सत्याचं महत्त्व आणि सत्य कितीही कटू असेल तरी ते स्वीकारण्याचं धाडस, अडचणी सोडविताना आवश्यक असलेला निष्पक्षपातीपणा, नेतृत्व करताना लोकांमध्ये महत्त्वाकांक्षा रुजवणं, मोठी स्वप्नं पाहण्यासाठी त्याग करणं आवश्यक आहे, हे त्यांना पटवून देणं याबाबतीत महात्मा गांधींनी माझे डोळे उघडले.
विकसित जगाच्या वेगाने माझा देश प्रगती का करू शकत नाही याबाबत मी सतत साशंक असायचो. त्यावेळी फ्रँट्स फॅनन माझ्या मदतीला आला. तो फ्रेंच आफ्रो कॅरिबिअन मानसोपचारतज्ज्ञ होता. उच्चभ्रू वर्गातले लोक खालच्या वर्गातल्या लोकांच्या जगण्यापासून फटकून राहिल्याचे सामाजिक-आर्थिक परिणाम देशाला कसे भोगावे लागतात, हे मला फॅनननं शिकवलं. पांढरे मुखवटे घातलेले (दुष्ट) उच्चभ्रू (डार्क एलिट्स इन व्हाईट मास्क्स) असा शब्द तो वापरतो. देशातले राज्यकर्ते आणि नागरिक यांच्यासाठी वेगवेगळे नियम असतात हा भ्रम या उच्चभ्रूंनीच रुढ केला, असं फॅनन म्हणतो. फॅननने केलेलं वसाहतोत्तर फ्रान्सचं वर्णन स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे लोटलेल्या भारतालाही लागू पडतं, असं समाजशास्त्रज्ञ म्हणतात. उदाहरणार्थ फॅनन सांगतो, त्याच्या देशातल्या उच्चभ्रूंनी आपल्या मुलांना महागड्या फ्रेंच शाळांमध्ये घातलं. दुसरीकडे आपली मुलं स्थानिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या गरीब पालकांवर स्तुतीसुमनं उधळली. वरवर समानता-एकात्मतेची आरती चालू ठेवली, पण आतून मात्र देशहित बाजूला ठेवून स्वार्थ साधण्याचा लुच्चेपणा केला. कोणे एकेकाळी वसाहत असलेल्या फॅननच्या देशात वसाहतोत्तर सरकारने नागरिकांना शून्य किंमत दिली.
देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देशातल्या विद्वानांनी सुचवलेल्या उपाययोजनांना तिथे केराची टोपली दाखवली जात असे. देशातील नेतृत्व उत्पादकता आणि समृद्धीबद्दल मोठमोठ्या बाता मारत असे, पण त्यांची उक्ती आणि कृती यात कुठलाही ताळमेळ नव्हता. नेत्यांनी ठरवलेल्या धोरणांमध्ये नियमांचं उल्लंघन होणं आणि त्यातून भरपूर लाच गोळा करता येणं यालाच प्राधान्य होतं. फॅननच्या देशातले निम्नस्तरीय सरकारी कर्मचारीही आपण कायद्यापेक्षा मोठे असल्याच्या टेचात वावरत. प्रामाणिकपणाच्या बाता मारणारे नेते टेबलाखालून सर्रास लाच घेत. मी व्यक्तिशः संपूर्ण अराजकीय आहे. आपल्या मेहनती नेतृत्वाबद्दल - त्यात राजकीय नेते, नोकरशहा, उद्योजक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असे सारेच आले- त्यांच्याप्रति मला अत्यंत आदर आहे. पण अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते बहुतांश विकसनशील देश ‘ब्लॅक स्कीन, व्हाइट मास्क’ दुभंगाचे बळी ठरत आहेत. म्हणजे त्यांना आपल्या मूळ वर्णाची आणि वास्तवाची जाण तर आहे; पण त्यांची मूल्ये आणि वर्तन मात्र गोऱ्या आक्रमकांसारखेच होत चालले आहे. म्हणजे मूळ काळ्यांच्या मानगुटीवर बसलेले गोरे भूत! ... भारत त्या मार्गाने जाऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे.
(‘आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘किलाचंद स्मृती व्याख्याना’चा संपादित संक्षिप्त अनुवाद : पूर्वार्ध)