एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरचा नवीन मुख्यमंत्री कोण? 'या'नावांची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:01 IST2025-02-10T12:00:07+5:302025-02-10T12:01:01+5:30
मणिपूर राज्यात गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल विरोधक सातत्याने एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते.

एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरचा नवीन मुख्यमंत्री कोण? 'या'नावांची जोरदार चर्चा
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंह आता मणिपूरचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांबाबत भाजप लवकरच दिल्लीत निर्णय घेऊ शकते. गेल्या दीड वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे मणिपूर राज्यात गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल विरोधक सातत्याने एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही तासांतच मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरचे भाजप आमदार हे एन. बिरेन सिंह यांच्यावर नाराज होते. याबाबत केंद्रीय नेतृत्वाला माहिती होती. मणिपूर विधानसभेचे अधिवेशनही १० फेब्रुवारीपासून सुरू होणार होते. भाजप आमदार स्वतः सभागृहात सरकारबाबत नाराजी व्यक्त करू शकतात, असे म्हटले जात होते.
याचबरोबर, राज्यातील १२ भाजप आमदार नेतृत्व बदलाची मागणी करीत होते. त्यामुळे एन. बिरेन सिंह यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली. सध्या भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते संबित पात्रा हे मणिपूरमध्ये आहेत. संबित पात्रा यांनी राज्यपाल अजय भल्ला यांचीही भेट घेतली आहे. मणिपूरमधील नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा करण्यासाठी संबित पात्रा हे मणिपूरला गेल्याचे सांगितले जात आहे.
मणिपूरच्या नवीन मुख्यमंत्रिपदासाठी ग्रामीण विकास आणि पंचायती राजमंत्री युमनाम खेमचंद सिंह, कॅबिनेट मंत्री टी विश्वजित सिंह आणि विधानसभा अध्यक्ष टी सत्यव्रत यांची नावे आघाडीवर आहेत. दरम्यान, एन. बिरेन सिंह २०१७ पासून मणिपूरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपचे सरकार आले आहे. असे असले तरी, गेल्या काही महिन्यांत मणिपूरमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे एन. बिरेन सिंह यांच्यावर विरोधकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.