Amit Shah On Mallikarjun Kharge : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संसदेत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. काँग्रेस, टीएमसी, सपा, बसपा, आप आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनी अमित शांहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, या सर्व आरोपांना स्वतः अमित शांहांनी बुधवारी(दि.18) पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
'राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान मी जे काही बोललो होतो, त्याचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आता माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. माझ्या राजीनाम्याने खरगे खूश होणार असलीत, तर कदाचित मी राजीनामा देईन. पण त्यामुळे खरगेंचा प्रश्न सुटणार नाही, त्यांना फायदा होणार नाही. पुढील 15 वर्षे त्यांना आहे त्याच जागी बसावे लागणार आहे, अशी बोचरी टीका अमित शाहांनी केली.
शाह पुढे म्हणतात, मी स्वप्नातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करू शकत नाही. उलट काँग्रेसनेच वारंवार बाबासाहेबांचा अपमान केला आहे. काँग्रेस आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी, संविधानविरोधी पक्ष आहे. ज्या वर्गासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्या वर्गातून खर्गे आले आहेत. किमान त्यांनी अशा चुकीच्या गोष्टीत सहभागी होता कामा नये. पण तुम्हालाही राहुल गांधींच्या दबावाखाली सहभागी व्हावे लागते.
काँग्रेसने देशात आणीबाणी लादून राज्यघटनेचा अवमान केला, न्यायव्यवस्था आणि लष्करातील हुतात्म्यांचा अपमान केला, भारताची भूमी इतर देशांना देण्याचे षडयंत्र रचले. आम्ही वस्तुस्थितीबद्दल बोललो, काँग्रेसकडे उत्तर नव्हते, त्यामुळे माझ्या विधानाचा विपर्यास केला आणि व्हिडिओ एडीट करुन व्हायरल केला. मी अशा पक्षातून आलो आहे, जो स्वप्नातही बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करू शकत नाही. बाबासाहेबांचा अपमान होईल असे काहीही आम्ही करू शकत नाही.
काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, पंडित नेहरुंनी स्वतःला भारतरत्न दिला. काँग्रेसने आपल्या नेत्यांना भारतरत्न दिले. 1990 पर्यंत त्यांनी आंबेडकरांना भारतरत्न मिळणार नाही, अशी व्यवस्था करुन ठेवली.1990 मध्ये काँग्रेस सत्तेत नसताना आणि भाजपच्या पाठिंब्याचे सरकार असताना बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. काँग्रेसने बाबासाहेबांची 100 व्या जयंती साजरी करण्यासही बंदी होती, अशी टीकाही शाहांनी यावेळी केली.