वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक असताना पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.
नरेंद्र मोदी 'नीच माणूस', मी बरोबरच बोललो होतो; मणिशंकर पुन्हा अवतरले, काँग्रेसला अडकवले?
नवी दिल्ली - वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक असताना पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'नीच प्रकारचा माणूस' असा आपण केलेला योग्यच होता, असे सांगणारा लेख अय्यर यांनी लिहिला आहे. मोदींनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत मी तेव्हा बरोबर भविष्यवाणी केली होती की नाही? असे अय्यर यांनी या लेखात म्हटले आहे. गुजरात निवडणुकीवेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख 'नीच प्रकारचा माणूस' असा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाने या वक्तव्यावरून मणिशंकर अय्यर यांना धारेवर धरत ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसची कोंडी केली होती. त्यानंतर या वक्तव्यासाठी अय्यर यांना माफी मागावी लागली होती. तसेच काँग्रेसनेही अय्यर यांच्या वक्तव्यापासून अंतर राखले होते. दरम्यान, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये मणिशंकर अय्यर यांनी त्यांनी 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यांचा हवाला देऊन मणिशंकर अय्यर या लेखात म्हणाले की, ''2017 मध्ये मी नरेंद्र मोदी यांना काय म्हटले होते हे आठवते का? मी योग्य भविष्यवाणी केली नव्हती का?'' दरम्यान, काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानापासून स्वत:ला बाजूला करताना चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कारवाई करतात, असे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवादाचा स्तर घसरवला आहे, अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली आहे. मणिशंकर अय्यर यांनी आपल्या लेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मोदींनी राजीव गांधींच्या 1987मधील लक्षद्वीप दौऱ्यावर केलेल्या वक्तव्यावरही अय्यर यांनी टीका केली.