तामिळनाडू पोटनिवडणुकीतल्या 20 जागा लढवणार- कमल हासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 21:19 IST2018-11-07T21:14:31+5:302018-11-07T21:19:01+5:30
मक्कल निधी माइम (एमएनएम)चे संस्थापक हासन यांनी पोटनिवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

तामिळनाडू पोटनिवडणुकीतल्या 20 जागा लढवणार- कमल हासन
चेन्नई- अभिनेते आणि नेते कमल हासन यांनी स्वतःच्या वाढदिवशीच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच नव्या पक्षाची स्थापना केली. आता त्यांचा तो राजकीय पक्ष तामिळनाडू पोटनिवडणुकीतल्या जागांवर निवडणूक लढणार आहे. मक्कल निधी माइम (एमएनएम)चे संस्थापक हासन यांनी पोटनिवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.
वाढदिवसानिमित्त ते म्हणाले, कोणालाही माहीत नाही, पोटनिवडणुका कधी होणार आहेत. परंतु जेव्हा केव्हा पोटनिवडणुका होतील, त्यासाठी आम्ही तयार आहोत. ज्या 20 जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. तिथे आमच्या पक्षाची 80 टक्क्यांहून अधिक पदे भरली आहेत. अण्णाद्रमुकच्या 18 विधानसभा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मद्रास हायकोर्टानं कायम ठेवल्याने अण्णाद्रमुकला मोठा धक्का बसला आहे.
या 18 आमदारांनी शशिकला- दीनकरन गटाचे समर्थन केले होते. यामुळे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली या आमदारांना अपात्र ठरविले होते. याविरोधात हे आमदार मद्रास उच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तिसरे न्यायमूर्ती सत्यनारायण यांची नियुक्ती केली होती. 12 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सत्यनारायण यांनी 31 ऑगस्टला यावरील निकाल राखून ठेवला होता. या आमदारांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपात्र ठरविण्यात आले होते.