"भारतातील मुस्लिम सर्वात जास्त निर्लज्ज"
By Admin | Updated: June 6, 2017 09:03 IST2017-06-06T09:03:55+5:302017-06-06T09:03:55+5:30
हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि सध्या अलकायदामध्ये असलेला दहशतवादी झाकीर मुसा याच्या मते भारतातील मुस्लिम सर्वात जास्त निर्लज्ज आहेत

"भारतातील मुस्लिम सर्वात जास्त निर्लज्ज"
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि सध्या अलकायदामध्ये असलेला दहशतवादी झाकीर मुसा याच्या मते भारतातील मुस्लिम सर्वात जास्त निर्लज्ज आहेत. मुसाने सोमवारी एक ऑडिओ रेकॉर्डिंग जारी केली आहे. या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये मुसाने "गजवा-ए-हिंद" (भारतावर विजय मिळवण्यासाठी शेवटची आणि अखेरची लढाई)साठी जिहादमध्ये सामील होण्यास नकार देणा-या भारतीय मुस्लिमांवर टीका केली आहे.
जम्मू काश्मीरमधील दोन वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी हा आवाज झाकीर मुसाचा असल्याचं सांगितलं आहे. मुसाने टेलिग्राफ आणि व्हाट्सअॅप ग्रुपवर आपली ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. "आपली लढाई फक्त काश्मीरपुरती मर्यादित नसून, ही लढाई इस्लाम आणि धर्मनिंदकांमध्ये आहे", असं मुसाने या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं आहे.
भारतीय मुस्लिमांना भडकवण्याच्या हेतूने मुसा देशात मुस्लिमांसोबत होणा-या घटनांचा संदर्भ देण्याचा प्रयत्न करत आहे. मुसाने ऑडिओ क्लिपमध्ये बिजनोर येथे चालत्या ट्रेनमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने मुस्लिम महिलेवर केलेला बलात्कार, कथित गोरक्षकांनी मुस्लिमाला मारहाण करत केलेली हत्या या घटनांचा उल्लेख केला आहे. भारतीय मुस्लिमांनी पीडितांच्या बाजूने आवाज न उठवल्याबद्दल मुसाने अपशब्द वापरले आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये बलात्कार पीडित महिलेचा उल्लेख करत तो सांगत आहे की, "बहिण आम्हाला माफ कर, आम्ही तुला काहीच मदत करु शकलो नाही याचं दुख: आहे".
भारतीय मुस्लिमांविरोधात आपला संताप व्यक्त करत मुसाने बोलला आहे की, "भारतातील मुस्लिम सर्वात जास्त निर्लज्ज आहेत. आपल्याला मुस्लिम म्हणताना त्यांना लाज वाटली पाहिजे. आमच्या बहिणींवर हात उगारला जात असताना भारतीय मुस्लिम मात्र इस्लाम शांतताप्रिय धर्म असल्याचं ओरडून सांगत आहेत".
मुसा बोलला आहे की, "जे लोक अत्याचार आणि अन्यायाविरोधात बोलू शकत नाही ते सर्व दुस-या धर्माचे आहेत. पैंगंबर आणि त्यांच्या अनुयायांकडून हिच शिकवण मिळाली आहे का ?..आपल्या सन्मानासाठी त्यांनी रक्त सांडलं".
भारतीय मुस्लिमांना उकसवण्याचा प्रयत्न करत मुसाने म्हटलं आहे की, "अजूनही तुमच्या लोकांकडे उभं राहण्याचा आणि आमच्यासोबत येण्यासाठी वेळ आहे. वेळ निघून जाण्याआधी पुढे या. गोरक्षकांना इस्लाम आणि मुस्लिम धर्माची ताकद दाखवा".