मुरादपूरचं होणार मुरलीपूर, इस्लामनगरचं ईश्वरनगर! या राज्यात एकाच जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:31 IST2025-02-11T13:31:02+5:302025-02-11T13:31:35+5:30
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गावांची नावं बदलण्याचा धडाका लावला असून, आता राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुरादपूरचं होणार मुरलीपूर, इस्लामनगरचं ईश्वरनगर! या राज्यात एकाच जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलणार
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलण्याची सुरू केलेली परंपरा आता मध्य प्रदेश सरकारनेही अंगीकारली आहे. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गावांची नावं बदलण्याचा धडाका लावला असून, आता राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
देवास जिल्ह्यातील पीपलरांवा गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री मोहन यादव यांना भाजपा जिल्हाध्यक्षांनी गावांची नावं बदलण्याबाबत एक यादी सोपवली. तसेच या गावांची नावं बदलण्यात यावी, अशी जनभावना असल्याचे सांगितले.
त्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच जिल्हाध्यक्ष रायसिंह सैंधव यांचा प्रस्ताव स्वीकारला. तसेच या ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा केली. तसेच या गावांची नावं बदलण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आता प्रशासकीय पातळीवर या गावांची नावं बदलली जातील.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच गावांची नावं बदलण्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री शाजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मंचावरूनच ११ गावांची नावं बदलण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून ज्या गावांची नावं उर्दू-अरबी भाषेत आहेत, अशा गावांची नावं बदलली जात आहेत. देवास जिल्ह्यामधील ज्या ५४ गावांची नावं बदलण्याची विनंती जिल्हाध्यक्षांनी केली होती त्या गावांमधील काही गावांची नावं मुरादपूर, हैदरपूर, शमशाबाद आमि इस्लामनगर अशी आहेत. मुख्यमंत्र्यांना जिल्हाध्यक्षांना या गावांच्या सध्याच्या नावांसोबत नव्या नावांची यादीही सोपवली आहे. त्यात मुरादपूरचं मुरलीपूर, हैदरपूरचं हीरापूर, शमशाबादचं श्यामपूर, इस्माइल खेडी गावाचं ईश्वरपूर, अलीपूरचं रामपूर, नबीपूरचं नयापूर आणि मिर्झापूरचं मीरापूर असं नामकरण सूचवण्यात आलं आहे.