संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:30 IST2025-07-15T11:29:30+5:302025-07-15T11:30:03+5:30
एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपत्तीसाठी मुलांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यास उशीर केला.

संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपत्तीसाठी मुलांनी आईचे अंत्यसंस्कार करण्यास उशीर केला. सुदामा देवीचा मृतदेह बरियारपूर पोलीस स्टेशन परिसरातून सुलतानगंज स्मशानभूमीत आणण्यात आला. परंतु संपत्तीच्या वाटणीवरून मुलांमध्ये वाद झाला. त्यामुळे सहा तासांसाठी अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण शांत झाले आणि अंत्यसंस्कार करता आले.
सुदामा देवी (८४) यांना आठ मुलं होती. यापैकी दोन मुलांचा आधीच मृत्यू झाला आहे. उर्वरित सहा मुलं अरुण कुमार यादव, बरुण कुमार यादव, सुनील कुमार यादव, लाल मोहन यादव, सत्य नारायण यादव आणि रतनलाल यादव जिवंत आहेत. सुदामा देवीचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या वेळी, धाकटा मुलगा लाल मोहन यादव याने संपत्तीवरून वाद सुरू केला. हा वाद स्मशानभूमीतच इतर भावांसोबत झाला.
संपत्तीच्या वाटणीवरून भांडणं सुरू
सर्व भावांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून भांडण सुरू झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. कोणीही त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हतं. त्यामुळे सुदामा देवीचा मृतदेह सहा तास स्मशानभूमीत पडून होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांची गर्दी जमली. कोणीतरी बरियारपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. बरियारपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मृत्युंजय कुमार स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी लाल मोहन यादव याला समजावून सांगितलं आणि मुलाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. यानंतर प्रकरण शांत झालं.
लाल मोहन यादव याने त्यानंतर त्याच्या आईवर अंत्यसंस्कार केले. संपत्तीचा वाद अजूनही सुरू आहे. कुटुंब आणि नातेवाईक प्रकरण सोडवण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. संपत्तीच्या वादातून आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मुलांमध्ये भांडण झाल्याची घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. संपत्तीच्या लोभात माणुसकी आणि नातेसंबंध विसरले गेले असल्याचं लोक म्हणत आहेत.