स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:49 IST2025-07-14T11:48:35+5:302025-07-14T11:49:13+5:30
या घटनेमुळे ग्रामस्थांच्या मनात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे.

स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
MP News: मध्य प्रदेशातून मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथील अशोकनगर जिल्ह्यातील नानकपूर गावात मुसळधार पावसात एका तरुणावर अंत्यसंस्कार करावे लागले. गावातील स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्यामुळे या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली. या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. ही घटना केवळ निष्काळजीपणाची नाही, तर असंवेदनशीलतेची पराकाष्ठा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन कुमार अहिरवार (२५) हा एका अपघातात जखमी झाला होता. उपचारानंतर तो घरी परतला, परंतु रविवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली अन् त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाने त्याचा मृतदेह गावातील नवीन स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणला, पण पंचायत सचिव सविता रजक यांनी स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्यामुळे अंत्यविधीस परवानगी नाकारली.
मुसळधार पावसात अंत्यविधी
अशा परिस्थितीत, कुटुंबातील सदस्यांना आणि ग्रामस्थांना जवळच्या एका मोकळ्या मैदानात अंत्यसंस्कारासाठी तात्पुरती व्यवस्था करावी लागली. लोखंडी पत्र्यापासून एक तात्पुरते शेड बनवण्यात आले आणि त्याखाली तरुणावर अंत्यविधी झाला. पावसामुळे लाकडं पेटत नव्हती, त्यामळे चक्क डिझेल ओतून तरुणाचा मृतदेह जाळावा लागला. हे दृश्य पासून ग्रामस्थांच्या मनात तीव्र नाराजी आहे.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही उद्घाटनाची वाट पाहायची का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की, त्यांनी पंचायतीकडे अंत्यसंस्कारासाठी मदत आणि लाकडाची मागणी केली होती, परंतु कोणीही ऐकले नाही. तर, गावातील लोक म्हणतात की, स्मशानभूमी अनेक महिन्यांपासून तयार आहे, परंतु उद्घाटन न झाल्यामुळे ही अमानवी परिस्थिती उद्भवली.