राऊत आम्हाला त्रास देतात; मला, माझ्या नवऱ्याला बंटी-बबली म्हणतात! राणांचं पोलीस आयुक्तांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:39 IST2022-04-27T13:34:17+5:302022-04-27T13:39:58+5:30
खासदार नवनीत राणांचं पोलीस आयुक्तांना पत्र; संजय राऊतांवर राणांचे आरोप

राऊत आम्हाला त्रास देतात; मला, माझ्या नवऱ्याला बंटी-बबली म्हणतात! राणांचं पोलीस आयुक्तांना पत्र
मुंबई/नवी दिल्ली: सध्या कोठडीत असलेल्या नवनीत राणांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी मागासवर्गीय जातीची आहे. संजय राऊत वारंवार माझ्याविरोधात बोलतात. वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन मला त्रास देतात, असं राणांनी पत्रात नमूद केलं आहे.
मी अनुसूचित जातीची सदस्य आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. २०१४ मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर शिवसेना उमेदवार, कार्यकर्ते मला धमकावू लागले. मी चांभार जातीची असल्यानं माझ्या जातीवरून खोटे आरोप करू लागले, असं राणांनी पत्रात म्हटलं आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. तेव्हापासून संजय राऊत माझ्याविरोधात बोलत आहेत. मी अनुसूचित जातीची आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन मला त्रास देतात. गेल्या दोन दिवसांत त्यांनी मला आणि माझ्या पतीला बंटी आणि बबलीला म्हटलं. माझ्या समाजाला बदनाम करण्यासाठी त्यांनी मला आणि माझ्या पतीला ४२० देखील म्हटलं, अशा शब्दांत राणांनी राऊतांची तक्रार केली आहे.