Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:41 IST2025-12-16T18:39:53+5:302025-12-16T18:41:35+5:30
Harsimrat Kaur Badal : हरसिमरत कौर बादल यांनी "तुम्ही नाव बदलण्यासाठी विधेयक आणत आहात. या विधेयकाद्वारे तुम्ही गरिबांचे हक्क हिरावून घेत आहात" असं म्हटलं आहे.

Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं (मनरेगा) नाव बदलण्यावरून राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षाचे खासदार यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. शशी थरूर, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी यावरून निशाणा साधला आहे. याच दरम्यान खासदार हरसिमरत कौर बादल यांनी "तुम्ही नाव बदलण्यासाठी विधेयक आणत आहात. या विधेयकाद्वारे तुम्ही गरिबांचे हक्क हिरावून घेत आहात" असं म्हटलं आहे.
मनरेगावरून सरकारवर निशाणा साधत कौर म्हणाल्या, "हे संसद भवन गरिबांच्या फायद्यासाठी बांधलं गेलं होतं. तुमच्याकडे वंदे मातरमवरून वाद घालण्यासाठी वेळ होता, ज्याचा कोणत्याही गरिबांना फायदा झाला नाही, परंतु आता तुम्ही नाव बदलण्यासाठी विधेयक आणत आहात. दुःखाची गोष्ट म्हणजे या नवीन विधेयकाद्वारे तुम्ही गरिबांच्या पोटावर लाथा मारत आहात आणि प्रभु श्रीरामाच्या नावामागे लपत आहात."
#WATCH | Delhi | SAD MP Harsimrat Kaur Badal says," You had all the time to debate on Vande Mataram, which benefits no poor person, but now you are bringing a bill to change the name (MGNREGA to be replaced with VB–G Ram G bill). Under this new bill, you are taking away the… pic.twitter.com/WkEpRLEIbp
— ANI (@ANI) December 16, 2025
"गरिबांना त्यांच्या १०० दिवसांच्या मजुरीपासून वंचित ठेवलं जात आहे, जो त्यांचा हक्क आहे. येथून जाणारा ९० टक्के पैसा ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे आणि याद्वारे तुम्ही राज्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. ज्या राज्यांकडे निधी नाही, तिथे मनरेगा नाही. केंद्र सरकार मनरेगा रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रभु श्रीरामाच्या नावामागे लपून असं करत आहे. त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे - गरिबांच्या कल्याणाशी त्यांचा काहीही संबंध नाही."
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनीही या मुद्द्यावरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत. तसेच मनरेगाच्या नामांतरावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम या योजनेचं नाव बदलून विकसित भारत- गँरंटी फॉर रोजगार आणि उपजीविका मिशन (ग्रामीण) (व्हीबी-जी राम जी) असं नवं नाव देण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. तसेच त्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. या विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. दरम्यान, ‘या विधेयकामुळे नागरिकांना रोजकाराचा असलेला कायदेशीर अधिकार कमकुवत होत आहे’ असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.