"मला विचारलेही जात नाही...", कमलनाथ यांनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:11 IST2025-01-08T09:40:22+5:302025-01-08T10:11:51+5:30
Kamal Nath : येत्या २६ जानेवारीला महू येथे काँग्रेसची मेगा रॅली होणार आहे.

"मला विचारलेही जात नाही...", कमलनाथ यांनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली नाराजी
मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ (Kamal Nath) यांनी पक्षाच्या संघटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या २६ जानेवारीला महू येथे काँग्रेसची मेगा रॅली होणार आहे. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर ज्येष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
या रॅलीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी काल रात्री काँग्रेसच्या एका समितीची झूमद्वारे बैठक झाली. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंगर, कमलनाथ, दिग्विजय सिंग आणि राज्य पीएसीचे इतर सदस्य उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान कमलनाथ म्हणाले, "आजकाल असे घडतंय की, मला संघटनेतील नियुक्त्यांबाबतही विचारले जात नाही. नियुक्त्यांबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली पाहिजे. तसेच, मला बैठकांची कोणतीही माहिती दिली जात नाही. यापूर्वीही असेच होत आले आहे. अलीकडेच मला मीडियाद्वारे माहिती मिळाली की, पीसीसीमध्ये एक बैठक झाली आहे."
दरम्यान, कमलनाथ हे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा होते. तसेच, ते मार्च २०२० ते एप्रिल २०२२ पर्यंत मध्य प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. मे २०१८ मध्ये त्यांची मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले होते. त्यांनी १७ डिसेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. मात्र, सरकारमध्ये बहुमत नसल्यामुळे २० मार्च २०२० रोजी राजीनामा त्यांनी दिला होता.
दिग्विजय सिंह सुद्धा नाराज!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय यांनीही एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "मला बैठकीच्या काही मिनिटांपूर्वीच बैठकीचा अजेंडा सांगण्यात आला होता. मोबाइलवरून बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. हे आमच्यासाठी योग्य नाही." दरम्यान, दिग्विजय सिंह सध्या काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. दिग्विजय सिंह हे त्यांच्या स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी ओळखले जातात आणि नेहमीच चर्चेत असतात.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिले उत्तर!
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी म्हणाले, "सर्व वरिष्ठ नेत्यांचे मत घेऊनच निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे काही गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे." तसेच, नुकतेच प्रवक्ते नियुक्तीबाबत पत्र देण्यात आले होते, मात्र वरिष्ठ नेते खूश नसल्याचे सांगितल्यावर सर्व नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्याचेही जितू पटवारी यांनी सांगितले.