छत्तीसगड : पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन काही उपक्रम राबविल्याच्या बातम्यातर सततच येत असतात, पण छत्तीसगड राज्यातील एका व्यक्तीने गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मोठा तलावच बांधला. त्यासाठी तो एकटा जमीन खणत होता. कोरिया जिल्ह्यातील सजा पहाड गावच्या श्यामलाल याने वयाच्या १५व्या वर्षी जमीन खोदून तलाव तयार करण्याचे आव्हान खांद्यावर घेतले.आता तो तलाव पूर्ण झाला आहे. श्यामलालचे आता वय आहे ४२ वर्षे. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील त्या गावात पूर्वी पाण्याची खूप चणचण होती. गायींना प्यायला पाणी नव्हते. तेव्हा १५ वर्षांच्या श्यामलालने खोदकामाला सुरुवात केली. गावकरी त्याला हसायचे. एकटा माणूस तलाव बांधेल, हे कोणाला खरेच वाटत नव्हते, पण श्यामलाल थांबला नाही. त्याने तलाव बांधून दाखविला. बिहारमधील दशरथ मांझी यांच्यासारखे हे काम मानले जाते. दशरथ मांझी यांनी २२ वर्षे राबून डोंगरातून रस्ता बांधून दाखविला. ते ‘माऊंटन मॅन’ म्हणून ओळखले जातात.श्यामलालने बांधलेल्या तलावाचा आता सारेच गावकरी उपयोग करीत आहेत. त्याचे प्रत्येक जण कौतुक करतात. महेंद्रगडचे आमदार श्याम बिहारी जायसवाल यांनी श्यामलालचा दहा हजार रुपये देऊन गौरवही केला.
‘माऊंटन मॅन’ - पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी २७ वर्षे राबून त्याने खोदला तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:12 IST