पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये ठेवून पत्नी मुलांना घेऊन तिच्या प्रियकरासोबत गाबय झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या महिलेच्या मुलग्याने आता या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे. आई आणि घरमालक असलेल्या काकांनी मिळून वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह निळ्या ड्रमामध्ये कोंबून लपवला, असे या मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.
विटभट्टीवर काम करणाऱ्या हंसराज याची त्याची पत्नी सुनीता हिने घरमालकाचा मुलगा असलेल्या जितेंद्र सोबत मिळून हत्या केली होती. याबाबत जबाबत देताना हंसराज याचा आठ वर्षांचा मुलगा हर्षल याने धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितले की, त्या रात्री बाबा, आई आणि जितेंद्र काकांनी मद्यपान केलं होतं. आईने दोन पेग घेतले होते. तर बाबा आणि काका यांनी खूप मद्यपान केलं होतं. त्यानंतर बाबांनी आईला मारण्यास सुरुवात केली. तेव्हा काकांनी आईला वाचवले. त्यानंतर आईने आम्हाला तिन्ही भावंडांना झोपवले.
हर्षल याने पुढे सांगितले की, मध्यरात्री जेव्हा माझी झोपमोड झाली तेव्हा मी बाबांना बेडवर पडलेलं पाहिलं. सकाळी उठलो तेव्हाही ते तिथेच पडलेले होते. तेव्हा जितेंद्र काकाने मला सांगितले की, तुझ्या बाबांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जितेंद्र काका आणि आईने पाणी भरण्याचा एक निळा ड्रम रिकामी केला. त्यात बाबांचा मृतदेह टाकला. त्यावर मीठ टाकलं आणि झाकण बंद केलं. त्यानंतर त्यांनी हा ड्रम लपवला.
यावेळी हर्षलने त्याची आई आणि जितेंद्र यांच्यात असलेल्या संबंधांबाबतही धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितले की, घरमालक असलेला जितेंद्र काका नेहमी आमच्या घरी यायचा. तो आईसोबत राहायचा. तिच्यावर प्रेम करायचा. आम्हाला चॉकलेट आणून द्यायचा. एवढंच नाही तर त्याने आम्हाला शाळेत प्रवेश मिळवून दिला होता. मात्र बाबांना जेव्हा या संबंधांबाबत माहिती मिळाली तेव्हा ते सांतापले. त्यांनी मारहाण सुरू केली. त्यांनी एकदा आईला विडीचे चटके दिले होते. तर एकदा माझ्यावरही हल्ला केला होता, असेही त्याने सांगितले.