"मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आपल्या आजीसारखी"; भाषा वादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 23:29 IST2025-07-11T23:29:09+5:302025-07-11T23:29:55+5:30
"भाषेचे राजकारण सोडून पुढच्या पिढीच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. हिंदी नाकारणे म्हणजे भविष्यातील संधींचे दरवाजे बंद करण्यासारखे आहे. हिंदी स्वीकारल्याने रोजगार आणि शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील."

"मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आपल्या आजीसारखी"; भाषा वादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले!
शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय आदी क्षेत्रांत हिंदीचा प्रभाव सतत्याने वाढत आहे. यामुळे तिला आंधळा विरोध करणे योग्य नाही, जनतेने भाषेबद्दलची संकुचित विचारसरणी सोडून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला हवी, असे आवाहन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केले आहे. ते हैदराबादमधील गच्चिबावली येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर आयोजित राज्य भाषा विभागाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होते.
तमिळ असूनही हिंदीवर प्रेम करायचे अब्दुल कलाम -
पवन कल्याण म्हणाले, "आपण परदेशात जातो आणि तेथील भाषा शिकतो, मग हिंदीची एवढी भीती का? आपण इंग्रजी सहज बोलतो, मग हिंदी बोलण्यात संकोच का? माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे तामिळ असूनही त्यांचे हिंदीवर प्रेम होते.
ते पुढे म्हणाले "आपण सांस्कृतिक अभिमानाला भाषिक कट्टरतेशी जोडू नये. मातृभाषा आपल्या आईसारखी आहे, तर हिंदी आपल्या आजीसारखी आहे. दुसरी भाषा स्वीकारल्याने आपली ओळख संपत नाही, उलट आपल्याला एकत्रितपणे पुढे जाण्याची संधी मिळते."
हिंदी नाकारणे भविष्यासठी धोक्याचे -
पवण कल्याण पुढे म्हणाले, "भाषेचे राजकारण सोडून पुढच्या पिढीच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. हिंदी नाकारणे म्हणजे भविष्यातील संधींचे दरवाजे बंद करण्यासारखे आहे. हिंदी स्वीकारल्याने रोजगार आणि शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील."
आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय म्हणजे संधी -
आंध्र प्रदेश सरकारने नुकताच शाळांमध्ये हिंदीला पर्यायी विषय म्हणून प्रोत्साहन देण्याची योजना जाहीर केली आहे. पवन कल्याण यांनी या उपक्रमाचे समर्थन केले. तसेच, "हे पाऊल तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनवेल. सरकार हिंदी शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून दर्जेदार शिक्षण सुनिश्चित होईल."
यावेळी त्यांनी, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना भाषेला विभाजनाचे नव्हे तर एकतेचे माध्यम बनवण्याचे आवाहनही केले. हा कार्यक्रम हिंदी भाषेचा प्रचार आणि संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.