5 मुलांची आई 4 मुलांच्या बापासोबत पळाली अन्...! महिलेचा नवरा विकतो वडा पाव, असं जुळलं सूत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:32 IST2025-04-10T14:31:46+5:302025-04-10T14:32:19+5:30
घरातून पळून गेलेल्या गीताला एकूण पाच मुले आहेत, यात चार मुली आणि एक मुलगा आहे...

5 मुलांची आई 4 मुलांच्या बापासोबत पळाली अन्...! महिलेचा नवरा विकतो वडा पाव, असं जुळलं सूत?
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महरिया गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने आपल्या जोडीदाराला आणि एकूण ९ मुलांना सोडून पळून जाऊन लग्न केले आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही कुटुंबांना फेसबुक पोस्टच्या माध्यमाने या त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली. संबंधित महिलेला ५ मुले आहेत, तर संबंधित पुरूष ४ मुलांचा बाप आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महरिया गावातील या नव-विवाहित जोडप्यांने त्यांचे कुटुंब आणि मुले आदी सोडून पळून जाऊन लग्न केले. महरिया गावातील रहिवासी गीता ही आठवडाभरापूर्वी येथीलच गोपाल नावाच्या व्यक्तीसोबत पळून गेली होती आणि दोघांनीही लग्न केले. ५ एप्रिल रोजी गावकऱ्यांनी गोपालच्या फेसबुक अकाउंटवर गीता आणि त्याच्या लग्नाचे काही फोटो पाहिले. हे फोटो स्वतः गोपालनेच शेअर केले होते. यानंतर गावकऱ्यांनी लगेचच गीताचा पती श्रीचंद आणि गोपालच्या पत्नीला यासंदर्भात माहिती दिली.
मुंबईत वडापाव विकतो गीताचा नवरा -
घरातून पळून गेलेल्या गीताला एकूण पाच मुले आहेत, यात चार मुली आणि एक मुलगा आहे. गीताची मोठी मुलगी १९ वर्षांची आहे, तर सर्वात लहान मुलगी पाच वर्षांची आहे. यासंदर्भात बोलताना गीताचा नवरा श्रीचंद म्हणाला की, तो मुंबईत वडा पाव विकतो. गेल्या काही दिवसांपासून तो घरीच छोटे मोठे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची पत्नी गोपालच्या घरी बऱ्याच वेळा ये-जा करत होती. दरम्यान, दोघांचे सूत कसे जुळले आणि ते कसे पळून गेले यासंदर्भात आपल्याला काहीच माहीत नाही.
गीता दागिने आणि पैसे घेऊन पळाली -
श्रीचंद पुढे म्हणाला, त्यांची पत्नी मोठ्या कष्टाने वाचवलेले ९० हजार रुपये आणि घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली. घडलेल्या घटनेची माहिती आपल्याला फेसबुकच्या माध्यमाने समजली. आपण तेव्हापासून पोलीस ठाण्यात चकरा मारत आहोत. मात्र, पोलीस मदत करत नाहीत. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी. जेणेकरून आपल्या कुटुंबाला न्याय मिळेल.
गोपाल पत्नीला मारहाण करायचा -
यासंदर्भात बोलताना गोपालची पत्नी म्हणाली, गोपाळ कुटुंबाच्या खर्चासाठी काहीही देत नव्हता, उलट रोज आपल्याला मारहाण करायचा. त्याने जेथे आहे, तेथेच रहावे. तिला मुलांच्या पालन पोषणासाठी वाटा मिळावा. तसेच गोपालने मुलांचा खर्चही उचलायला हवा.
यासंदर्भात बोलताना, सिद्धार्थ नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुज सिंह म्हणाले, आपल्याला या घटनेची माहिती आहे, मात्र अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.