मशीद म्हणजे धार्मिक स्थळ नाही - सुब्रमण्यम स्वामी
By Admin | Updated: March 15, 2015 12:45 IST2015-03-15T12:43:31+5:302015-03-15T12:45:26+5:30
मशीद हे धार्मिक स्थळ नसून ती एक साधी इमारत असते व मशिदीला कधीही पाडता येते असे वादग्रस्त विधान भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

मशीद म्हणजे धार्मिक स्थळ नाही - सुब्रमण्यम स्वामी
ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. १५ - मशीद हे धार्मिक स्थळ नसून ती एक साधी इमारत असते व मशिदीला कधीही पाडता येते असे वादग्रस्त विधान भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
आसाममधील गुवाहाटी येथील एका कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी यांनी वादग्रस्त विधान केले. सौदी अरेबियामधील उदाहरण देत स्वामी म्हणाले, सौदी अरेबियामध्ये रस्ते बांधण्यासाठी मशिदी पाडण्यात आल्या. मशीद ही फक्त साधी इमारत आहे. तिला कधीही पाडता येऊ शकते. भारतातील सर्व मुसलमान आधी हिंदूच होते असा वादग्रस्त दावाही त्यांनी या कार्यक्रमात केला. स्वामी यांच्या विधानाचे आसाममध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. मुस्लीम संघटनांनी स्वामी यांच्याविरोधात निदर्शने केली. कृषक मुक्ती संग्राम समितीने स्वामींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संस्थेचे अध्यक्ष अकिल गोगोई यांनी भाजपा निवडणुकीपूर्वी जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचार्य यांनी हे स्वामींचे वैयक्तिक मत असून ही पक्षाची भूमिका नाही असे सांगितले.