भुवनेश्वर: ओडिशातील दक्षता पथकाने बुधवारी सकाळी मलकानगिरी जिल्ह्यातील पाणलोट विभागाचे उपसंचालक आणि प्रकल्प संचालक शंतनू महापात्रा यांच्या निवासस्थानासह ठिकठिकाणी छापा टाकला. यावेळी, दक्षता पथकाने आतापर्यंत १.५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा दक्षता पथकाने बुधवारी सकाळी मलकानगिरी पाणलोट विभागाचे उपसंचालक आणि प्रकल्प संचालक शंतनू महापात्रा यांच्याशी संबंधित सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा आरोप आहे. त्यामुळे ओडिशातील जयपोर दक्षता न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांकडून सर्च वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.
दक्षता पथकाने जयपोरमधील शंतनू महापात्रा यांच्या तीन मजली घरासह मलकानगिरीमधील सहाय्यक कृषी अभियंता मोहन मंडल यांच्या घरावर, मलकानगिरीमधील डेटा एंट्री ऑपरेटर विश्वजित मंडल यांच्या घरावर, मलकानगिरीमधील कंत्राटी कर्मचारी अमियाकांत साहू यांच्या घरावर छापे टाकले आहेत. तसेच, मलकानगिरीमधील शंतनू महापात्रा यांच्या कार्यालयासह कटकमधील बालीसाही येथील त्यांचे वडिलोपार्जित घरावर, नुआपाडा आणि भुवनेश्वरमधील भीमटांगी गृहनिर्माण मंडळ कॉलनीतील त्यांच्या नातेवाईकाच्या घरासह अशा सात ठिकाणी छापे टाकले आहेत.
दरम्यान, ही मोठी कारवाई करण्यासाठी २ अतिरिक्त एसपी, ४ डीएसपी, १० इंस्पेक्टर, ६ एएसआय सहभागी झाले आहेत. छाप्यादरम्यान दक्षता अधिकाऱ्यांनी कागदपत्रांचीही तपासणी केली. ज्यामुळे अधिक माहिती समोर येऊ शकते. जप्त केलेल्या रोख रकमेची आणि कागदपत्रांची दक्षता पथक सखोल चौकशी करत आहे. तसेच, दक्षता पथकाने आतापर्यंत १.५ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.